मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला दुसरा उमेदवारही शनिवारी रात्री घोषित केला आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या सहीने प्रकाशित झालेल्या पत्रकात जालन्याचे राजेश राठोड यांचे नाव विधान परिषदेसाठी निश्चित करण्यात आले आहे. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बीड जिल्हा अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांच्या नावाचीही घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी 6 उमेदवार रिंगणात उतरवणार हे स्पष्ट झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
संख्याबळानुसार भाजप 4, राष्ट्रवादी 2 आणि शिवसेना 2 आणि काँग्रेस 1 जागेवर निश्चित विजय मिळवू शकते. पण काँग्रेसने अतिरिक्त एक उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणुकीत चुरस वाढणार आहे. महाविकास आघाडीला आपले 6 उमेदवार निवडणूक आणण्यासाठी 174 मतांची आवश्यकता आहे. तर भाजपला आपले 4 उमेदवार निवडून आणण्यासाठी 116 मतांची आवश्यकता आहे. सत्ताधारी आणि विरोधकांना ही अतिरिक्त मतांची गरज असून आता सर्व भिस्त छोटे पक्ष आणि अपक्ष मतांवर असणार आहे. विश्वादर्शक ठरावात महाविकास आघाडीने 170 मतांचे संख्याबळ सिद्ध करून सरकार स्थिर केले होते. मात्र, आघाडीला अतिरिक्त 4 मतांची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे आपले 4 उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला अतिरिक्त 7 मतांची गरज आहे. काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मैदानात उतरवल्याने अपक्षांचे महत्व वाढले आहे. गुप्त मतदान पद्धत असल्याने 10 उमेदवार रिंगणात असल्याने मतांची बेगमी कुणाच्या पारड्यात पडते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधीमंडळाचे सदस्य करून घटनात्मक पेच टाळण्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील अतिशय आणीबाणीच्या काळात निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे यांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी दक्षता म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या तयारीत होते. मात्र, काँग्रेसने एक अतिरिक्त उमेदवार दिल्याने आघाडीतही आलबेल नसल्याचेच चित्र आहे.