मुंबई -राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आज शनिवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्याचे ठरवले होते. मात्र, त्यांची ही भेट अचानक रद्द करण्यात झाली. त्यामुळे राज्यात अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राज्यपालांसोबतची भेट का रद्द झाली? याबाबत कोणत्याही पक्षाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. मात्र, या तीनही पक्षातील नेते राज्यपालांना पुढील आठवड्यात भेटणार असल्याचे राजभवन येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हे वाचलं का? - काँग्रेस, राष्ट्रवादीसह सेनेचे नेते उद्या घेणार राज्यपालांची भेट
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीनही पक्ष मिळून सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली करीत आहेत. त्यासाठी समान किमान कार्यक्रमाचा मसुदा देखील तयार करण्यात आला. तो मसुदा वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, आता वरिष्ठांनी हिरवा कंदील दिल्यानंतर सरकार स्थापन करू, असे तीनही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यपालांसोबत होणारी ही भेट सत्ता स्थापनेच्यादृष्टीने देखील महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, यामध्ये फक्त दुष्काळासंदर्भात चर्चा होणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले होते. तरीही या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.