मुंबई- राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यपालांकडे आपला दावा सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली. दुसरीकडे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्याचे एक पाऊल पुढे टाकत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने सेनेसोबत चर्चा करण्याचा मार्ग खुला केला. त्यामुळे येत्या काही दिवसात या पक्षांमध्ये होणाऱ्या चर्चा आणि विचारांवर एकमेकांचे पटल्यानंतर राज्यात सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यातूनच आम्ही सर्वसमावेशक, असा कार्यक्रम तयार करणार असल्याचे आज आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून सांगण्यात आले.
सर्वसमावेशक कार्यक्रमानंतरच होणार राज्यात 'महाशिवआघाडी' आज सकाळपासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये आमदारांसोबत झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी शरद पवार यांना सेनेसोबत जाण्याचा आणि त्यावर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार बहाल केले. त्यासाठी समिती गठीत करण्याचा ठराव मंजूर केला गेला. त्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काँग्रेससोबत चर्चा केल्याशिवाय सेनेसोबतसोबत जाण्याचा कोणताही निर्णय जाहीर केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा - राऊत यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीची पूर्ण कल्पना- दीपक सावंत
तर सायंकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सरचिटणीस राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, वरिष्ठ नेते अहमद पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला आले. या भेटीदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सत्तेत सहभागी होण्याबद्दल एकमत झाले. मात्र, सेनेकडून विविध विषयांवर चर्चा विनिमय करून याविषयी निर्णय घेण्याचे ठरले आणि त्याची माहिती पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात आली.
शिवसेनेने आम्हाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी पहिल्यांदा फोन केला. मात्र, इतक्या कमी वेळेत त्यांच्यासोबत चर्चा करून अनेक विषयावर एकमत होणे अवघड होते. मात्र, आता आम्ही एकत्र बसून चर्चा करून यावर निर्णय घेऊ, असे या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा -राष्ट्रपती राजवटीचा सरकार बनवण्यावर कोणताही अडथळा नाही - श्रीहरी अणे
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल महोदयांनी वेळ वाढवून न देता राज्यात थेट राष्ट्रपती राजवट लागू केल्याने याविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी या निर्णयाची मी निंदा करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. तर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी राज्यात आता चर्चा करूनच पुढील निर्णय घेतले जातील, असे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात महाशिवआघाडीचे सूत जुळण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.