मुंबई :राज्यातील लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली. निधी वाटपात काँग्रेस पक्षावर अन्याय झाला आहे. सत्ताधाऱ्यांनी निधी वाटपात पक्षपातीपणा दाखवला असून काँग्रेसच्या आमदारांना तुटपुंजा निधी दिला आहे. दोन दिवसांत विकासनिधी न दिल्यास काँग्रेस न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
काँग्रेस आमदारांना कमी निधी :राज्यातील लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी वाटप करण्यात आला. निधी वाटपात काँग्रेसवर अन्याय झाला आहे. निधी वाटपात सत्ताधारी पक्षाला झुकतेमाप दिलेल दिसून येत आहे. मात्र, काँग्रेसच्या आमदारांना अत्यल्प निधी देण्यात आला असा आरोप नाना पटोले यांना सरकारवर केला आहे. निधी वाटपसंदर्भात काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी केली आहे. दोन दिवसात विकास निधी नाही दिला तर, काँग्रेस न्यायालयात धाव घेईल असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ते आज विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधत होते.
विकास निधी द्या अन्यथा कोर्टात जाणार :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्ट मंडळाने आज विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निधी वाटपा संदर्भात चर्चा केली. त्यानंतर प्रसार माध्यमांना बैठकी संदर्भात माहिती देताना नाना पटोले म्हणाले की, आमदारांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधी वाटपामध्ये असमानता आहे. यासंबंधी आमच्या काँग्रेस शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.