महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपला सत्तेपासून दूर ठेवा; काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत आमदारांची मागणी - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत तरुण आमदारांची बैठक झाली. या बैठकीला राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांचा अपवाद वगळता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात

By

Published : Nov 6, 2019, 10:34 PM IST

मुंबई- राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा आणि सत्तेपासून दूर ठेवावे, अशी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत काँग्रेस आमदारांनी मागणी केली. आमदारांच्या या मागणीसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठबळ दिले असल्याने हा विषय लवकरच दिल्लीत हाय कमांडला कळविण्यात येणार आहे.

बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत तरुण आमदारांची बैठक झाली. या बैठकीला राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांचा अपवाद वगळता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार उपस्थित होते. त्यासोबत काँग्रेसचे तरुण आमदार अमित देशमुख, विश्वजीत कदम यांच्यासह विधानपरिषदेचे सदस्य बंटी पाटील आदी आमदार उपस्थित होते.

हेही वाचा -शिवसेनेने भाजपसोबत जाऊ नये, आपची मागणी

या बैठकीमध्ये राज्यातील सर्व तरुण आमदारांनी काँग्रेसने वाटेल ते भूमिका घ्यावी. परंतु, भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे, अशी मागणी लावून धरली. या मागणीला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठबळ दिल्याने काँग्रेस राज्यात शिवसेनेच्या सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेसने कोणत्याही स्थितीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे, याच मुद्द्यावर आमची ही बैठक महत्त्वाची ठरली असल्याची माहिती बैठकीनंतर आमदार विश्वजीत कदम यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले, की आमची बैठक काही अनौपचारिक होती. राज्यात जी राजकीय परिस्थिती सुरू आहे, त्या विषयवार ही बैठक झाली. त्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्षाकडून भूमिका घेणे आदी विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा - 'देशाला वाचवण्यासाठी काँग्रेस पुन्हा रस्त्यावर उतरली'

आम्हाला जनतेने विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिला आहे, त्यात आम्हाला शिवसेनेकडून पाठिंबा देण्याचा तसा काही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत राज्यातील शेतकरी आणि सर्व सामान्य जनता अडचणीत आहे, त्यामुळे लवकर सरकार बनले पाहिजे, असे विषय झाले असल्याची माहिती थोरात यांनी दिली.

दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी सांगितले, की भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यावर सर्वच काँग्रेस आमदारांचे एकमत आहे. आम्ही आज तरुण आमदारांच्या भूमिका बैठकीत जाणून घेतल्या. दिल्ली हायकामंडला आम्ही आमची स्थानिक भूमिका कळवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अशोक चव्हाण म्हणाले, की आम्ही त्यांचा कल जाणून घेतला. भाजपला सत्तेपासून लांब ठेवावे, असे सर्वांचे मत झालेले आहे. आज आमचे नेते हुसेन दलवाई यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. ती खासगी भेट होती. त्याचा पक्षाच्या भूमिकेशी काहीही संबंध नसल्याचे थोरात आणि त्यानंतर अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details