मुंबई- राज्यातील भीषण दुष्काळाने महाराष्ट्र होरपळून निघाला असताना राज्य सरकार मात्र दुष्काळी उपाययोजनांबाबत फारसे गंभीर दिसून येत नाही. त्यामुळे आता राज्यपालांनीच राज्य सरकारला ठोस पावले उचलण्याचे निर्देश देऊन दुष्काळग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने आज केली.
काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सायंकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली व त्यांना यासंदर्भातील निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आ. बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. नसिम खान, आ. बसवराज पाटील मुरूमकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. मधुकरराव चव्हाण आदींचा प्रामुख्याने समावेश होता.
या प्रसंगी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दुष्काळाच्या तीव्रतेबाबत अवगत केले. राज्य सरकारच्या नियोजनशून्य धोरणामुळे दुष्काळी उपाययोजनांचा उडालेला बोजवारा आणि त्याचे जनतेवर झालेले प्रतिकूल परिणाम, याविषयी खा. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, आ. बाळासाहेब थोरात, आ. मधुकरराव चव्हाण, आ.प्रा. विरेंद्र जगताप, आ. सुनिल केदार आदींनी राज्यपालांना विस्तृत माहिती दिली. राज्यातील जनतेला होणारा प्रचंड त्रास पाहता राज्यपालांनी हस्तक्षेप करून सरकारला प्रभावी उपाययोजना करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणीही प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.
या शिष्टमंडळामध्ये आ. प्रा. विरेंद्र जगताप, आ. अमर राजूरकर, आ. डी.पी. सावंत, आ. संग्राम थोपटे, आ. वसंतराव चव्हाण, आ. डॉ. वजाहत मिर्झा, कृपाशंकर सिंग, जयवंतराव आवळे, आ. त्रिंबकराव भिसे, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. के. सी. पडवी, नामदेवराव पवार, आ. हुस्नबानो खलिफे, आ. सुभाष झांबड, आ. मोहनराव कदम, आ. गोपालदास अग्रवाल, आ. सुनिल केदार, आ. जयकुमार गोरे, आ. विश्वजीत कदम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, प्रदेश सेवादलाचे मुख्य संयोजक विलास औताडे, सरचिटणीस पृथ्वीराज साठे, तौफिक मुल्लानी आदी नेते व पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता.