मुंबई - मागील काही दिवसापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खळबळजनक वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. माझ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पाळत ठेवत असल्याचे वक्तव्य करत पटोले यांनी खळबळजनक उडवून दिली होती. त्यांच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत वादंग निर्माण होत असल्याचे चित्र असल्याने कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पटोले यांच्यावर घुमजाव करण्याची पाळी आली आहे.
वादग्रस्त विधानानंतर टाळाटाळ
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. तेव्हापासून आघाडीत धुसफूस वाढली होती. तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद उफाळून येत आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची नेहमीच भर पडते. पटोले यांनी आता ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ माजली आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ही पटोले यांच्या विधानावर भाष्य करण्याचे टाळले. तर काही नेत्यांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मात्र, नाना पटोले यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. माहितीचा अभावामुळे त्यांनी वक्तव्य केले आहे. विधान करण्यापूर्वी नाना पटोले यांनी कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घ्यायला हवी, अशा शब्दात शरसंधान साधले.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून बगल
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानासंदर्भात पत्रकारांनी खर्गे यांना परिषदेत छेडले असता, देशातील गंभीर परिस्थितीची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्रात आलो आहे. पक्ष नेतृत्वाने ती जबाबदारी मला दिली आहे. मात्र, पटोले यांच्या विधानावर प्रभारी एच. के. पाटील उत्तर देतील. ते तीन दिवस मुंबईत राहणार असून यासंदर्भात लवकरच माहिती दिली जाईल, असे सांगत खर्गे यांनी नाना पटोले यांचा मुद्दा टाळला.
शब्द पाळणार - माणिकराव ठाकरे
तीन पक्षाचे सरकार असल्याने काही चुका होत असतात. तिघांनीही एकमेकांना सांभाळून निर्णय घ्यायला हवा. प्रत्येक पक्षाला वाटते की, आपला पक्ष वाढायला हवा, पुढे जावा. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचीही तीच भूमिका आहे. कोणीही वेगळा अर्थ काढू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेसने एकत्र पाच वर्षे सत्तेत राहू, असा शब्द दिला आहे. तो आम्ही पाळू, असे माणिकराव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगत सारवासारव केली.
प्रथम माहिती घ्यावी - नवाब मलिक
सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील सर्वाचे महत्त्वाच्या नेत्यांवर आणि त्यांनी केलेल्या दौऱ्यावर गृहखाते लक्ष ठेवत असते. त्या नेत्यांची माहिती घेण्याचे काम गृह खात्याकडून रोज करण्यात येते. नेत्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणेला अलर्ट राहता यावे, म्हणून ही माहिती संकलित केली जाते. याबाबत नाना पटोले यांना माहित नसेल तर, काँग्रेस पक्षामध्ये असलेले माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून त्यांनी माहिती घ्यायला हवी होती, असे नवाब मलिक यांनी म्हणाले.
नाना पटोले यांचा खुलासा
पुण्यात असताना, कार्यकर्त्यांनी काही तक्रारी केल्या होत्या. स्थानिक पातळीवर त्रास होत असल्याचे कार्यकर्ते सांगत होते. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, दौरे सुरू आहेत. काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद वाढला आहे. त्याचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्र्यांकडे जातो. हा रिपोर्ट केवळ राज्य सरकारकडेच नाही तर केंद्र सरकारडेही जात असतो. सर्व घडामोडींची माहिती केंद्र आणि राज्याकडे जात असते. सरकारकडे रोज प्रत्येक विभागाची, जिल्ह्याची माहिती जात असते. माझीच नाही तर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचीही माहिती जात असते. ही प्रोसिजर मी कार्यकर्त्यांना सांगत होतो. ही भूमिका मी मांडली. मी अत्यंत साधेपणाने बोललो. परंतु, त्याचा विपर्यास केला गेला. विनाकारण कहाण्या बनविण्याचे काम सुरू झाले आहे, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे.