मुंबई :मणिपूर राज्यातील दोन महिलांवर झालेल्या सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. मणिपूर राज्यातील दोन महिलांवरील अत्याचाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस पक्ष देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, मणिपूर हा आपल्या देशाचा भाग आहे. अनेक दिवस काही गोष्टी दाबून ठेवल्या जातात. मी, काल रात्री तो व्हिडिओ बघितला. मला व्हिडिओ पाहून धक्काच बसला. केंद्र, राज्य सरकार निर्लज्जपणे वागत आहेत. महिलांच्या प्रश्नाविषयी त्यांना गांभीर्य नाही. महिलांची सुरक्षा करणे, त्यांची जबाबदारी नाही का? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
हैवानांचे राज्य :मणिपुरात भाजपचे राज्य नाही, तर हैवानाचे राज्य असल्याचा घणाघात यशोमती ठाकूर यांनी केला आहे. दोन महिने उलटून गेल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर प्रतिक्रिया देत नाहीत. व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर ते दोन शब्द बोलले असे समजते. याबाबत पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे. आपण भारत देशात राहतो. महिलांवर होणारे अत्याचार पाहता सरकार काहीच करत नाही. जेव्हा-जेव्हा महिलांवर अत्याचाराचे प्रकार घडले. त्यावेळेस महाभारत घडले आहे. सत्तेत बसलेले बेजबाबदारीने वागत आहेत. त्यांनी खुर्च्या रिकाम्या केल्याच पाहिजेत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. देशात आता महाभारत झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका ठाकूर यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :मणिपूरमधील दोन महिलांवरील अत्याचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. मी रात्री ट्वीट करतानाही विचार केला. महिलांना अशी वागणूक मिळायला नको. ७० दिवस ही बातमी समोर आली नाही. मणिपूरमध्ये असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. तेथील मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. तसेच मणिपूर येथे राष्ट्रपती राजवट लावण्याची गरज असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.