मुंबई :खासदार गजानन किर्तीकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश केला आहे. किर्तीकर यांचा हा पक्षप्रवेश म्हणजे मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातील मतदारांना दिलेला धोका आहे. त्यामुळे त्यांनी आधी राजीनामा द्यावा (Sanjay Nirupam demanded Gajanan Kirtikar resign), अशी मागणी काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Congress leader Sanjay Nirupam demanded) यांनी केली आहे. तसेच किर्तीकर राजीनामा देत नाहीत. तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये निरुपम बोलत होते.
राजीनामा द्यावा लागेल :या प्रसंगी निरुपम म्हणाले की, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पक्ष सोडण्याचा निर्णय त्यांचा होता. त्यावर मला काही बोलायचं नाही. त्यांनी का आणि कोणत्या अमिषाला बळी पडून पक्ष सोडला ? यात मला जायचे नाही. पण माझे असे मत आहे की, शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार म्हणून तुम्ही निवडणूक लढवली होती, धनुष्य-बाण चिन्हावर तुम्ही निवडून आला होता. आता जेव्हा तुम्ही पक्ष सोडला आहे. त्यामुळे तुम्हाला आता संसद सदस्य म्हणूनही राजीनामा द्यायला हवा. ही गद्दारी आहे. ज्या पक्षाने तुम्हाला सगळे काही दिले, ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी तुम्हाला जास्तीत जास्त मत देऊन निवडून आणले त्यांच्याशी विश्वासघात केलेला आहे. तुम्हाला जास्त मत मिळाली म्हणून तुम्ही निवडून आला आणि कमी मिळाली त्यामुळे मी पराभूत झालो. त्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, अशी मागणी निरुपम यांनी केली.