मुंबई - राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सरकार म्हणून आघाडीच्या आणि विशेषता काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांचा फोटो लावला जातो. परंतु, शिवसेनेकडून मात्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा कधी फोटो का लावला जात नाही, असा प्रश्न काँग्रेसचे नेते व मुंबई काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.
शिवसेनेला सत्तेत बसल्यानंतरही काँग्रेसबद्दल कसलीही मित्रपक्ष म्हणून आपुलकी नाही. केवळ संधीसाधूपणा करण्यासाठी सत्तेत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी व भाजपाला भीती दाखवण्यासाठी आणि इशारा देण्यासाठी शिवसेनेने ही संधी साधली आहे. परंतु, शिवसेनेच्या मनात काँग्रेसबद्दल कुठेही आपुलकी अथवा जिव्हाळा किंचितसुद्धा नाही, असेही निरुपम यांनी सांगितले.