मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. मुंबईतील वाढत्या कोरोनामुळे निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईतील परप्रांतीय मजुरांच्या हाताला काम नाही. परिणामी हजारो परप्रांतीयांनी मुंबईतून गावची वाट धरली आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी गावी निघालेल्या परप्रांतीयांची मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर भेट घेतली. तसेच, निरूपम यांनी राज्य सरकारने लावलेल्या कठोर निर्बंधाचा निषेध व्यक्त केला.
परप्रांतीय मजुरांची गैरसोय
राज्यभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिलपर्यंत पुन्हा निर्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचा धक्का घेत मुंबईत काम करणाऱ्या हजारो परप्रांतीय मजुरांनी मुंबई सोडून जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसवर परप्रांतीयांची गर्दी उसळली आहे. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी लोकमान्य टिळक टर्मिनसवर भेट घेतली. गावी जाणाऱ्या या मजुरांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सरकारने लावलेल्या निर्बंधांमुळे आज परप्रांतीय मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यांचा हाताला काम नाही. त्यामुळे राज्य सरकारचा निषेध व्यक्त करतो, असे यावेळी निरूपम यांनी म्हटले.
चुकीच्या निर्णयामुळे हजारो मजूर बेरोजगार
संजय निरुपम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'मी नेहमीच लोकमान्य टिळक टर्मिनसवर येत असतो. यावेळी महाराष्ट्र शासनाकडून लावण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे संपूर्ण दुकाने बंद आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झालेली आहे. तसेच, बंद असलेल्या दुकान मालकांनी मजुरांना सांगितले की, आम्ही तुम्हाला वेतन देऊ शकत नाही. तुम्ही आपापल्या गावी निघून जा. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून परप्रांतीय मजूर आपल्या राज्यात जात आहेत. गेल्यावर्षी सुद्धा राज्य सरकारने लॉकडाऊन लागू केला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली होती. तसेच, मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. आम्ही अनेकदा राज्य सरकारला विनंती केली की, पुन्हा लॉकडाऊन लावू नका. मात्र, राज्य सरकारने आमचं ऐकलं नाही. परिणामी अनेक मजुरांचा रोजगार गेला आहेत. याला राज्य सरकार दोषी आहे'.