मुंबई -सत्ताधारी विरोधकांना आणि विरोध करणाऱ्यांना ज्यावेळी देशद्रोही म्हणू लागतात त्यावेळेला ते हुकूमशाहीचे निदर्शक असते. जगातील सर्व हुकूमशाही राज्यांनी त्यांच्या प्रशासनाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही असे म्हटले आहे. मोदी सरकारने गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्या विरुद्ध झालेल्या प्रत्येक आंदोलनाची देशाच्या विरोधातील कट म्हणूनच संभावना केली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या अधिकारांसाठी लढणाऱ्या गरिब शेतकऱ्यांच्या आंदोलनाला चीन-पाकिस्तानाशी जोडून शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे देशात लोकशाही नाही तर मोदीशाही असल्याचे दर्शवणारा आहे. या वक्तव्याचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे व दानवे यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणी करत आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना सावंत म्हणाले, मागील 6 वर्षांमध्ये मोदींसह भाजपच्या सर्वच नेत्यांनी विरोधकांची देशद्रोही म्हणून संभावना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांना देखील देशविरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या सहा वर्षात देशात झालेले प्रत्येक आंदोलन, जेएनयु, भीमा-कोरेगाव, शाहीन बाग, आयआयटी मद्रास, रोहित वेमुला, या सर्व आंदोलनांना टुकटे टुकडे गँग किंवा देशद्रोहाशी जोडण्याचा प्रयत्न गेला होता. सीएएच्या आंदोलनालाही असाच रंग देऊन देशविरोधातील कट ठरवण्याचा प्रयत्न झाला. काश्मीरमध्ये होणाऱ्या विरोधालाही तसाच रंग देण्यात आला. हाथरस घटनेनंतरही सरकारविरोधातील कट होता असे दाखवून युएपीए कायद्याअंतर्गत पत्रकारांना अटक करण्यात आली. देशात विक्रमी प्रमाणात देशद्रोहाचे खटले दाखल केले आहेत.
तशाच पद्धतीची वागणूक केवळ विरोधकांनाच नाही तर विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलकांना भाजपकडून मिळालेली आहे. महाराष्ट्रातही विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना नक्षलवादी ठरवण्यात आले. देशद्रोही म्हणून संभावना करण्यात आली. शेतकरी सुकाणू समितीला जिवाणू समिती म्हणण्यात आले. रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांना शिवी दिली होती. देशात सध्या मोदी सरकारच्या काळ्या कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या गरिब शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये आबालवृद्ध, आयाबहिणी सामिल झालेले आहेत. त्यांच्या कपड्यावरुन ते शेतकरी आहेत का असा प्रश्न विचारला, त्यांना खलिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न झाला. आता यांचा संबंध पाकिस्तान व चिनशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. 56 इंच छाती म्हणवणाऱ्या मोदींच्या नेतृत्वामध्ये दिल्लीच्या रस्त्यांवरती पाकिस्तान व चीन देशविरोधात कसा काय कट करु शकतो याचे उत्तर मोदींनीच दिले पाहिजे. हे मोदींचे अपयश नाही का?, असा सवाल सावंत यांनी उपस्थित करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.