मुंबई - महाराष्ट्रात भाजप सेनेच्या सरकारने मागील ५ वर्षांत कोणता विकास केला, कोणत्या मोठया योजना आणल्या हे मुख्यमंत्री का सांगत नाहीत? असा सवाल करत काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री आर.पी.एन. सिंग यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
मुंबईत राजीव गांधी भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आर.पी.एन. सिंग यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारमुळे देश आर्थिकदृष्ट्या रसातळाला गेल्याचा घणाघाती आरोपही केला. तर, राज्यातील स्थिती ही अत्यंत दयनीय बनली असून कुठलाच विकास झाला नसला तरीही मुख्यमंत्री या विकासाचे मुद्दे सोडून 370 कलम यावर बोलत सुटले आहेत. त्यामुळे त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावे असे आवाहन सिंह यांनी केले.
हेही वाचा - ' वांद्र्याचे पार्सल वांद्र्याला पाठवा अन् यामिनी जाधवांना विधानसभेत पाठवा'
आज राज्यात शेतकऱ्यांचे मुद्दे अत्यंत गंभीर बनले आहेत. हजारो शेतकरी मुंबईत पायी चालत आले, त्यांना काय मिळाले? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा झाली परंतु, काही मिळाले नाही. निवडणूक सुरू असताना शेतकरी आत्महत्या करत आहेत. ही सरकारसाठी मोठी लाजिरवाणी बाब आहे. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची एक वीट रचली गेली नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे कामही अर्धवट सोडले. आज राज्यात २२ हजार कंपन्या बंद झाल्या, लाखो बेरोजगार झाले आहेत. सरकारकडे आता गुंतवणूक येत नाही, काँग्रेसच्या काळात १ क्रमांकावर असलेले राज्य आता मागे पडले आहे. राज्यात सर्व बाजूने विकासाचे मार्ग खुंटले असताना सरकार यावरून राज्यातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ३७० सारखे मुद्दे आणत असल्याचे सिंग म्हणाले.