मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड त्यांचे तात्काळ निलंबनाची एकीकडे मागणी करायची, अन् दुसरीकडे सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला नऊ महिने उलटून गेल्यानंतरही सीबीआयची चौकशीबाबत बोलायच नाही, अशी दुटप्पी भूमिका भाजपने घेतली आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच राजपूत सीबीआय चौकशीचे काय झाले, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे. दरम्यान राठोड दोषी असल्यास काँग्रेस देखील आपली भूमिका स्पष्ट करेल असे पटोले म्हणाले.
सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीचे काय झाले? नाना पटोलेंचा भाजपला सवाल
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला नऊ महिने उलटून गेल्यानंतरही सीबीआयची चौकशीबाबत बोलायच नाही, अशी दुटप्पी भूमिका भाजपने घेतली आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
काँग्रेसची भूमिका स्पष्ट करू-
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मंत्री राठोड संशयाच्या भोवऱ्यात आहेत. भाजपने हे प्रकरण उचलून धरत निलंबनाची मागणी केली आहे. अशातच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आदेश दिले होते. मात्र मंत्री राठोड यांनी पोहरादेवी येथे केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे कोरोनाचा फैलाव वाढला आहे. महंत यांच्यासहीत अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मंत्री राठोड यांच्यावर किती दिवसात कारवाई होईल असा प्रश्न विचारला असता, पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यावर, यात राठोड दोषी आढळल्यास काँग्रेसची स्पष्ट केली जाईल, असे पटोले म्हणाले.
भाजपची सुशांतबाबत दुटप्पी भूमिका-
अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येला नऊ महिने पूर्ण झाले आहे. सीबीआय मार्फत या घटनेची चौकशी सुरू आहे. काँग्रेसकडून सातत्याने सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशी अहवालाबाबत केंद्राला विचारणा करत आहोत. भाजप याबाबत काहीच बोलत नाही. मात्र राठोड प्रकरणात भाजपकडून घाई सुरू आहे. तशीच घाई सुशांतसिंग राजपूत याच्या चौकशीबाबत का दाखवली जात नाही, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे. यामुळे भाजपची गोची होण्याची शक्यता आहे.
माजी खासदार आत्महत्या प्रकरणी आरोपींवर गुन्हे नोंदवा-
दादरा नगर हवेलीचे माजी खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस विभागाकडूनही चौकशी सुरू आहे. मात्र डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी १५ पानी सुसाईड नोट तयार केली. देशाच्या राज्यकर्त्यांसहित गुजरातच्या राज्यकर्त्यांवर दोषारोप नोंदवला आहे. त्या सुसाईड नोटच्या आधारावर जेवढे कुणी आरोपी असतील, मग देशाच्या सर्वोच्च पदावर का असेनात, त्या सर्वांवर तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी काँग्रेसची मागणी असल्याचेही पटोले म्हणाले.
जनतेला भिकारी बनवण्याची मानसिकता-
आपल्या देशामध्ये केंद्राच्या सरकारने जी मोहीम हातात घेतली आहे. ती जनतेला भिकारी करण्याची आहे. डिझेल, पेट्रोल, गॅस सातत्याने होणारी दरवाढ, १८ रुपये रस्ते विकाससाठी, ४ रुपये शेतकऱ्यांच्या विकासासाठी असे २२ रुपये केंद्र सरकार लोकांच्या खिशातून घेत आहे. त्यातच रस्त्यावर चालण्यासाठी टोल वसुलीचा भुर्दंड सोसावा लागतो. केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या या भूमिकेचा काँग्रेस वारंवार विरोध करत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढ कृत्रिम आहे. ती काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमती वाढल्या आहेत, म्हणून नाही. भाजप हे जाणीवपूर्वक करत असून देशातील जनतेच्या ताटातील अन्न हिसकावून लावण्याचे लक्षण आहे. त्यामुळे ते मुद्दाम करतात, असा आरोप नाना पटोले यांनी केला.