मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता पक्षांतराला उधाण आले आहे. नागपूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी यांनी आज हातात शिवबंधन बांधले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दुष्यंत यांनी आज शिवसेनेते प्रवेश केला.
दुष्यंत चतुर्वेदी हे नागपूर विद्यापीठचे सिनेट सदस्य असून ते नागपूर येथील लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि संचालकही आहेत. लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे नागपूर आणि मुंबईत मिळून एकूण २८ शाळा महाविद्यालये असून यात 2 हजार शिक्षक कार्यरत आहेत. तर २० हजारापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने याचा शिवसेनेला फायदा होणार आहे.
दुष्यंत चतुर्वेदींनी हातात घेतले 'शिवधनुष्य' दुष्यंत चतुर्वेदींच्या शिवसेना प्रवेशामुळे पूर्व आणि पश्चिम विदर्भात शिवेसेनेची ताकद वाढणार आहे. लवकरच त्यांना शिवसेनेत नवी जबाबदारी देणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी आज सांगितले.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला उधान आले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयदत्त क्षीरसागर यांच्यानंतर आता नागपूर काँग्रेसचे नेते दुष्यंत चतुर्वेदी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
सतिश चतुर्वेदी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. परंतू,त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. नागपूर महापालिका निवडणुकीत बंडखोर उमेदवारांचा प्रचार करून काँग्रेस उमेदवारांच्या पराभवासाठी त्यांनी प्रयत्न केल्याने आणि पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती.