मुंबई - कोरोनानंतर तब्बल दोन वर्षानंतर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ( Nagpur Winter Session ) येत्या सोमवारपासून नागपूरला होत आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी विरोधकांची आहे. मात्र, विदर्भातील जनतेला न्याय देण्यासाठी अधिवेशन नागपूरला घ्या, असा भाजपचा एकेकाळी असलेला आग्रह आता मावळला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात ( Congress Leader Balasaheb Thorat Criticize To Bjp ) यांनी भाजपवर निशाणा साधला. कामकाज सल्लागार समितीची ( Working Advisory Committee ) आज बैठक झाली. त्यानंतर थोरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
नागपूर अधिवेशनचा कालावधी वाढवावानागपूरमध्ये होणाऱ्या अधिवेशनचा कालावधी 30 डिसेंबरपर्यंत असेल. दोन आठवड्याचे अधिवेशन असले तरी मध्ये विविध सुट्ट्या आल्या आहेत. अधिवशेनाचा कालावधी वाढवून, तीन आठवड्याचे करावे, अशी आमची मागणी होती. शेतकऱ्यांचे प्रश्न, नैसर्गिक आपत्तीची मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. वीज कनेक्शन कापण्यात येत आहेत. महाराष्ट्र - कर्नाटक सीमा ( Maharashtra Karnataka Border Dispute ) प्रश्नांवर सरकारने भूमिका मांडलेली नाही. ती राज्याला समजावी, अशी मागणी होती. परराज्यात जात असलेल्या प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी अवधी मिळावा. मागील दोन वर्षे कोरोनामुळे चर्चा करता आली नव्हती, त्यामुळे कालावधी वाढवावा, अशी मागणी केली होती. एकेकाळी नागपूरमध्ये अधिवेशन घ्यावे, मागणी लावून धरणारे आता सत्तेत येताच कालावधी वाढण्यास तयार नाहीत, असा हल्लाबोल थोरात यांनी भाजपवर केला.