मुंबई - बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपूरमध्येच भाजपला हादरा बसला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह मित्र पक्षाने भाजपचा पराभव केला आहे. या निकालावरुन राज्यातील जनतेने भाजपच्या विभाजनवादी राजकारणाला नाकारले असल्याचे वक्तव्य महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. तसेच थोरात यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदनही यावेळी केले.
'भाजपच्या विभाजनवादी राजकारणाला जनतेने नाकारले' - नागपुर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव
नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह मित्र पक्षाने भाजपचा पराभव केला आहे. या निकालावरुन राज्यातील जनतेने भाजपच्या विभाजनवादी राजकारणाला नाकारले असल्याचे वक्तव्य महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
विदर्भात भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या नागपूर जिल्हा परिषदेचा निकाल धक्कादायक आला असून, भाजपचा दारुण पराभव झाला आहे. ज्या नागपुरात भाजपचे दिग्गज नेते आहेत, तिथेच त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, फडणवीस यांनी प्रचाराचा झंझावात केला. मात्र, त्याचा फारसा प्रभाव पडला नसल्याचे दिसून आले. या पराभवानंतर भाजपच्या पतनाला सुरुवात झाली असल्याची टीका आता राजकीय वर्तुळातून होऊ लागली आहे.
सर्वसमावेशक विकासासाठी मतदारांनी दिलेल्या संधीबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मतदारांचे आभार मानले. नागपूरबरोबरच बुलढाणा जिल्हा परिषदेवर महाराष्ट्र विकास आघाडीचा झेंडा फडकला. बुलडाण्यात काँग्रेसच्या श्रीमती मनीषा पवार यांची अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या श्रीमती कमलताई बुधवंत यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचेही थोरात यांनी अभिनंदन केले.