मुंबई :मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर शासनाने तातडीने 'क्युरेटिव्हिटीशन' दाखल करण्याचा निर्णय घेतला. तसेच नववा आयोग नेमून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे जाहीर केले. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांचे मागासलेपण सिद्ध करावे लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे काही अपेक्षित असतील ते सर्व शासन करणार असेल, अशी घोषणा केली. तसेच आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी राहिल्या, त्या दूर केल्या जातील आणि मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असा दावा केला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आला आहे.
केवळ सत्तेसाठीच घोषणाबाजी:देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात गेला. तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयाने वारंवार या प्रस्तावाला फेटाळून मराठा आरक्षण देणे शक्य नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे; मात्र राजकीय पक्षांकडून आरक्षणाच्या मुद्द्याचे भांडवल केले जात आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा मुद्दा फेटाळून लावला. यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका करताना माझ्या हातात सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो अशी भीमगर्जना केली. आज शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरल्याचे कोर्टाच्या निर्णयावरून दिसून येत आहे. विरोधकांनी त्यावरून फडणवीसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत, केवळ सत्तेसाठी घोषणाबाजी करत असल्याची टीका केली.