मुंबई - सार्वजनिक बांधकाम मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकली असून, आज त्यांना कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 25 मे रोजी अशोक चव्हाण यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात कोरोनाचे उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. नुकताच त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली आहे. रुग्णालयातील बाहेर येताना त्यांनी एक व्हिडिओ शेअर करून या संदर्भातील माहिती दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात
अशोक चव्हाण यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात कोरोनाचे उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. नुकताच त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली आहे.
25 मे रोजी काँग्रेसचे नेते चव्हाण यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मुंबईत हलवण्यात आले होते. त्याच दरम्यान त्यांना एअर अॅम्बुलन्सने मुंबईत आणले जाणार होते. मात्र, त्यांना ती परवानगी नाकारण्यात आल्याने त्यांनी रस्ता मार्गाने रुग्णवाहिकेने मुंबई गाठली.
चव्हाण यांना रक्तदाब आणि मधुमेह यासारखे आजार असल्याने नांदेड येथे उपचार न करता त्यांना मुंबईत हलवण्यात आले होते. विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर चव्हाण यांच्या वाहनचालकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून चव्हाण यांनी स्वतःला वेगळे क्वारंटाईन करून घेतले होते. त्याच दरम्यान 24 मे रोजी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल आला होता. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना मुंबईला हलविण्यात आले होते. अशोक चव्हाण यांच्या रुग्णालयातील सुट्टीनंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.