मुंबई -आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने आज वडाळा येथे असलेल्या विठ्ठल मंदिराशेजारील मोनो रेलच्या दादर पूर्व स्थानकाचे 'विठ्ठल मंदिर वडाळा' स्थानक असा प्रतिकात्मक नामकरण सोहळा केला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात या स्थानकावर सर्वत्र ‘विठ्ठल मंदीर वडाळा’ असे नामफलक लावून नामकरण झाल्याचे जाहीर करण्यात आले.
काँग्रेसने केले मोनो रेलच्या दादर पूर्व स्थानकाचे प्रतिकात्मक नामकरण
काँग्रेस आणि स्थानिक नागरिकांकडून वेळोवेळी मागणी करूनही मुंबई मोनोरेलच्या दादर पूर्व स्थानकाला ‘विठ्ठल मंदीर वडाळा’ असे नाव दिले जात नव्हते. यामुळे आज हा नामकरण सोहळा केला असल्याचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
काँग्रेस आणि स्थानिक नागरिकांकडून वेळोवेळी मागणी करूनही मुंबई मोनोरेलच्या दादर पूर्व स्थानकाला ‘विठ्ठल मंदीर वडाळा’ असे नाव दिले जात नव्हते. यामुळे आज हा नामकरण सोहळा केला असल्याचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात माहिती देताना डॉ. वाघमारे म्हणाले की, मोनोरेलचे हे स्थानक वडाळ्यात आहे. या स्थानकाचा पीन कोड आणि वडाळ्याचा पीन कोड एकच आहे. दादरशी याचा काहीही संबंध नाही. मात्र, या परिसरात बांधकाम करणाऱ्या बिल्डरना हा दादर पूर्व असल्याचे सांगून अधिक किंमतीने जागा विकता यावी, या एकमेव कारणास्तव या स्थानकाला दादर पूर्व हेच नाव देण्याचा अट्टाहास एमएमआरडीएने घेतला आहे.
वडाळ्यात तुकाराम महाराजांनी प्राणप्रतिष्ठा केलेले शेकडो वर्ष जुने विठ्ठल मंदीर आहे. या मंदिराची ख्याती प्रती पंढरपूर अशीच आहे. रोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात. या पार्श्वभूमीवर मोनोरेलच्या स्थानकाला ‘विठ्ठल मंदीर वडाळा’ हे नाव देण्याची मागणी सातत्याने केली जाते आहे. मात्र, केवळ बिल्डरांच्या हितास्तव या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे आम्ही आज स्वतःच या स्थानकाला ‘विठ्ठल मंदीर वडाळा’ असे नाव दिल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले. सरकारला विठुरायाप्रती थोडी जरी आस्था असेल तर गुरूवारी आषाढी एकादशीचे औचित्य साधून राज्य सरकारने यासंदर्भातील घोषणा करावी, अशीही मागणी त्यांनी केली.