मुंबई - महानगरपालिकेच्या नगरसेवकांचे प्रगती पुस्तक दरवर्षी प्रजा फाऊंडेशनच्यावतीने प्रकाशित करण्यात येते. यावर्षी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रगती पुस्तकामध्ये प्रथमच काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. आजवर भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक पहिल्या दहामध्ये चमकत असत. यावर्षी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी टॉप टेनमध्ये मजल मारली. एवढेच नाही तर सत्ताधारी शिवसेना आणि पहारेकरी असलेल्या भाजपला मागे टाकत काँग्रेस पक्ष हा महानगरपालिकेत पहिला क्रमांक पटकावत सरस ठरला आहे.
प्रजा फाऊंडेशनच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या प्रगती पुस्तकामध्ये भाजपच्या हरिष छेडा आणि नेहल शाह यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळवला, तर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे शिवसेनेचे बाळा नर व समाधान सरवणकर हे आहेत. परंतु पहिल्या दहा क्रमांकामध्ये सत्ताधारी शिवसेनेचे केवळ दोनच नगरसेवक असून विरेाधी पक्षातील तीन नगरसेवक आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते रवी राजा(७वा क्रमांक), विरेंद्र चौधरी (८वा क्रमांक) आणि कमरजहाँ सिध्दीकी (१०वा क्रमांक) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदा सत्ताधारी पक्षाचे केवळ दोनच नगरसेवक पहिल्या दहामध्ये असून भाजपाच्या पाच नगरसेवकांचा त्यात समावेश आहे.
आजपर्यंतच्या प्रजाच्या अहवालात पहिल्या दहामध्ये ना विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असायचा ना गटनेत्यांचा. परंतु, यंदा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी बाजी मारत आघाडी घेतली असून भाजपच्या गटनेत्यांचाही यामध्ये समावेश आहे. यंदा दोन गटनेत्यांचा समावेश टॉपटेन नगरसेवकांमध्ये झाला आहे. आजवर विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी जबाबदारी पार पाडली असली तरी अभ्यासू नगरसेवक आणि आपल्या सहकारी नगरसेवकांना कायम मार्गदर्शन करणे यामुळे यंदा काँग्रेसच्या तीन नगरसेवकांना पहिल्या दहामध्ये स्थान मिळवता आले. एकूण ३० नगरसेवकांपैकी २८ नगरसेवकांची कामगिरी चांगल्या प्रकारची असल्याचे पत्रक प्रजा फाऊंडेशनने दिली आहे. काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांची कन्या निकिता निकम, सुप्रिया मोरे वगळता उर्वरीत २८ नगरसेवकांची कामगिरी उत्तम असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले.