मुंबई :काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उभय नेत्यांच्या बैठकीनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, शिवसेना युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते.
उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सोबत : या प्रसंगी बोलताना वेणुगोपाल राव म्हणाले की, सध्या देशामध्ये अराजकता, हुकूमशाही सुरु आहे. ती संपवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक लढा सुरु आहे. त्यांच्यासोबत आम्ही ठामपणे उभं असल्याचं सुद्धा वेणुगोपाल राव यांनी यावेळी सांगितलं. या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी वेणुगोपाल यांचे आभार मानून देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं.
राहुल गांधी यांची अनुपस्थिती :के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असं सांगितलं होतं. परंतु काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत बोलताना राहुल गांधी हे सध्या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार नसून काँग्रेस महासचिव वेणुगोपाल राव हे भेटणार घेणार असल्याचं सांगितले. त्या प्रमाणे आज या नेत्यांची भेट झाली असून त्यांच्यात अनेक विषयावर चर्चा झाली आहे.