मुंबईAshish Shelar criticizes Congress :झारखंडमध्ये काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात सुमारे नऊ कपाटांमधून दोनशे कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यावरून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. भ्रष्टाचार, दलाली, लूटमार, कमिशन, लाचखोरीच्या इतिहासानं काँग्रेस उद्ध्वस्त झाल्याचं त्यांनी म्हटंल आहे. पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेनं आता काँग्रेसचे काळे कारभार उघडकीस आहे आहेत. काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराचं समीकरण झालं आहे, तर दुसरीकडं मोदी भ्रष्टाचार निर्मूलनाची हमी देत असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं आशिष शेलार म्हणाले. ते आज मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
गांधी करप्शन सेंटर :यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, झारखंडमधील काँग्रेसच्या खासदाराच्या घरात कोट्यवधींची रोकड सापडली असेल, तर काँग्रेसच्या अन्य नेत्यांच्या घरात किती संपत्ती आहे, याचा हिशेब जनतेनं करावा. तसंच जिथं काँग्रेसचा लोकप्रतिनिधी असेल, तिथे भ्रष्टाचाराची हमी असते,जिथं भाजपाचा प्रतिनिधी असेल तिथं स्वच्छ कारभाराची हमी असते, असं शेलार म्हणाले. काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांना ज्या केंद्रातून भ्रष्टाचाराचं प्रशिक्षण मिळतं ते केंद्र आता देशाला ज्ञात झालं आहे. त्या केंद्राचं नाव गांधी भ्रष्टाचार केंद्र ठेवावं, असा उपरोधिक टोलाही शेलार काँग्रेसला लगावाला आहे.