महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपशासित सात राज्यात कोट्यवधींचा 'स्कॅनिया बस' घोटाळा; काँग्रेसने केली एनआयएमार्फत चौकशीची मागणी - स्कॅनिया बस घोटाळा काँग्रेस चौकशी मागणी

नागपूर महानगरपालिकेपासून कोल इंडियापर्यंत स्कॅनिया बस आणि ट्रक खरेदीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस नेते डॉ. संजय लाखे-पाटील यांनी केला. ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता होती आणि आहे, अशा ठिकाणी हा घोटाळा झाल्याचे लाखे-पाटील यांनी सांगितले.

Scania Bus scam news
स्कॅनिया बस घोटाळा न्यूज

By

Published : Mar 13, 2021, 7:15 AM IST

मुंबई - भाजपशासित सात राज्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा 'स्कॅनिया बस' घोटाळा झाला आहे. गाड्यांचे नंबर बदलण्यापासून लाच, भ्रष्टाचारासारखे आर्थिक व्यवहार पियुष गोयल आणि नितीन गडकरी यांनी केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते डॉ. संजय लाखे-पाटील यांनी केला आहे. केंद्रीय दक्षता आयोगाकडे या प्रकरणाची तक्रार केली असून एनआयए मार्फत चौकशीची मागणी केल्याची माहिती लाखे-पाटील यांनी दिली. गांधी भवन येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपशासित सात राज्यात कोट्यवधींचा 'स्कॅनिया बस' घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे

नागपूर महानगरपालिकेपासून कोल इंडियापर्यंत स्कॅनिया बस आणि ट्रक खरेदीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. मंत्र्यांच्या मुलीच्या लग्नासाठी भेट दिलेल्या लक्झरी बस, तसेच अनेक गाड्यांचे चेसीस नंबर आणि प्लेट बदलण्यात आले आहेत. याच गाड्या कोल इंडियाच्या उपकंपनीला नव्या गाड्या म्हणून विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्कॅनिया कंपनीने केलेल्या अंतर्गत चौकशीतून ही बाब समोर आल्याचे लाखे-पाटील म्हणाले.

एनआयएमार्फत चौकशी करा -

नागपूर महानगरपालिका, केंद्र सरकारचा भूपृष्ठ परिवहन विभाग, कोळसा मंत्रालय आणि भाजपशासित सात राज्य सरकारे यात गुंतलेली आहेत. त्यामुळे केंद्रीय दक्षता आयोगाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री आणि कोळसा मंत्री यांच्याविरोधात केंद्रीय दक्षता आयोगाकडेही तक्रार केली आहे. हा प्रकार देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असून याची एनआयएमार्फत चौकशीची मागणी केल्याचे लाखे-पाटील यांनी सांगितले.

गैरव्यवहारामुळे उत्पादन बंद -

हा प्रकार व्यावसायिक नितीमुल्यांचा भंग करणारा आहे. लाच देणे, सहकारी आणि इतर गैरव्यवहारांचा यात समावेश असल्याने भारतातील उत्पादन प्रकल्प आम्ही बंद केल्याचे स्कॅनिया या बस व वाहन उत्पादक कंपनीचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी हेन्री हेनरिक्सन यांनी रॉयटर्स या जगप्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. तसेच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने यासंदर्भात खुलासा करताना, सदर व्यवहाराचा आणि मंत्री महोदयांचा काहीही संबंध नाही असे म्हटले आहे. नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरपालिका आणि स्कॅनिया कंपनीबरोबर सामंजस्य करारासाठी पुढाकार घेऊन या व्यवहाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप लाखे-पाटील यांनी केला आहे.

पंतप्रधानांनी दोघांनाही पदावरून हटवावे -

‘ना खाऊँगा, ना खाने दूँगा’ म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी व पियुष गोयल या दोन मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. या भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी त्यांना मोदींनी पदावरून दूर करावे, अशी मागणीही लाखे-पाटील यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details