मुंबई:विधान परिषदेचे आमदार आणि राज्यसभेचे खासदार यांनी त्यांचा आमदार आणि खासदार निधी (BJP MLA and MP Fund) पक्षाकडे सुपूर्द करावा, असा निर्णय भाजपा प्रदेशाध्यक्षांनी (Chandrashekhar Bawankule) घेतल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटू लागल्या आहेत. अजूनही आमदार खरेदी करायचे आहेत का? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.
बिगर निधीचे लोकप्रतिनिधी:राज्यातील भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आणि राज्यसभेचे खासदार यांना मिळणारा विकास निधी त्यांनी 2024 पर्यंत पक्षाकडे सुपूर्द करावा. पक्ष सांगेल त्याप्रमाणे तो निधी खर्च केला जाईल, असे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत दिले आहेत. यामुळे भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि विधान परिषदेचे आमदार आता बिगर निधीचे लोकप्रतिनिधी असणार आहेत. राज्यसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्यांना दरवर्षी पाच कोटी रुपयांचा विकास निधी मिळत असतो. सहा वर्षात त्यांना 30 कोटी रुपये विकास निधी मिळतो मात्र भाजप सदस्यांच्या निधीचा वापर कुठे करायचा याचा निर्णय श्रीकांत भारतीय, खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांची समिती करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. मात्र यामुळे आमदार आणि खासदारांच्या हक्कांवर गदा येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अजूनही आमदार खरेदी करायची आहे का? :या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जहरी टीका केली आहे. आमदार आणि खासदारांचे निधी पक्षाकडे वळवून पक्षाला आणखी आमदार खरेदी करायचे आहेत का? 50 खोके एकदम ओके हा कार्यक्रम अजून संपला नाही का? लोकशाहीवादी पक्ष असे स्वतःला म्हणून घेणाऱ्या भाजपाने आमदारांच्या हक्कांवर गदा आणि हे पैसे पक्षाकडे वळवणे हा त्या आमदारांचा अपमान नाही का? असे सवाल अतुल लोंढे यांनी उपस्थित केले आहेत.
आमदारांनाही विश्वासात घेणे गरजेचे:तर शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापिका मनीषा कायंदे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, विधान परिषदेचे आमदार आणि राज्यसभेचे खासदार यांचा निधी कसा वापरावा यासाठी एखाद्या पक्षाने सूचना करणे अपेक्षित आहे. मात्र तो निधी पक्षाकडे सुपूर्द करून पक्ष म्हणेल त्याप्रमाणे खर्च करणे, हे संबंधित लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे. लोकप्रतिनिधींच्या विकास निधीचा वापर करताना त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे, असे मत कांयदे यांनी व्यक्त केले आहे.
पक्षाच्या निर्णयाचे स्वागत:दरम्यान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य असून यामुळे ग्रामीण भागातील वंचित मतदार संघाचा विकास करणे पक्षाला शक्य होणार आहे. महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघांमध्ये भाजपाचा आमदार नाही अशा मतदारसंघांचा विकास करण्यासाठी हा निधी वापरण्याचा पक्षाचा मानस आहे. त्यासाठी नेमण्यात आलेली सदस्य समिती योग्य तो निर्णय घेऊन सदर मतदारसंघांचा नक्कीच विकास करेल. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला त्याचा लाभ होईल. त्यामुळे या निर्णयाचे स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते आसिफ बामला यांनी व्यक्त केली आहे.