मुंबई :छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ या सभेला परवानगी देण्यावरून रंगलेल्या नाट्याला अखेर महाविकास आघाडीला सशर्त परवानगी मिळाली आहे. मात्र ही परवानगी देण्यासाठी राज्य सरकारने प्रशासनाच्या अडून महाविकास आघाडीची अडवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. ते आज मुंबईत बोलत होते.
भाजपाला पराभवाची चाहूल :दरम्यान भारतीय जनता पक्षाला आता पराभवाची चाहूल लागली असून त्यांनी महाविकास आघाडीच्या सभा वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. असे सांगत तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी, महाविकास आघाडीच्या सभा होणारच असा दावा लोंढे यांनी केला आहे. लोंढे म्हणाले की, तुम्हाला प्रशासनाच्या अडून महाविकास आघाडीच्या सभा थांबवता येणार नाही. महाविकास आघाडीच्या बाजूला पूर्ण जनता असल्यामुळे तुमची आता घाबरगुंडी उडालेली आहे असे लोंढे म्हणाले.
भाजला भीती :महाविकास आघाडीच्या सभामुळे भाजपला समोर पराभव दिसत आहे. भाजपला पराभवाची चाहूल लागल्याने त्यांनी प्रशासनाच्या आड रडीचा डाव सुरू केल्याचा आरोप लोंढे यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अडून खेळण्यापेक्षा दम असेल तर मर्दासारखे मैदानात येऊन लढा असे आव्हान, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपला दिले आहे. यापुढे महाविकास आघाडीच्या सभांना परवानगी नाकारून अथवा त्या अडवून दाखवा असा दम देखील त्यांनी शिंदे भाजप सरकारला दिला आहे. महाविकास आघाडीच्या सभा होणार म्हणजे होणारच असा दावाही लोंढे यांनी केला आहे.