मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर राजकीय पक्षांमधे ट्विटवॉर सुरू झाले आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसने त्यांच्या @INCIndia या अधिकृत ट्विटर हँडलवर आज दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी एक ट्विट आणि गाणे पोस्ट केले आहे. या ट्विट आणि गाण्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बदनामीकारक, असत्य व द्वेषपूर्ण टिपण्णी करण्यात आली आहे. याविरोधात आज भाजपने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार केली आहे.
भाजपने निवडणूक अधिकाऱ्यांना दिले पत्र काँग्रेसचे हे ट्विट ट्विटरवरून त्वरीत काढावे, अशी मागणी भाजपने केली आहे. निवडणूक प्रचार काळात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा, जातीय द्वेष व असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल काँग्रेस पक्षावर कारवाई करावी, अशी मागणीही भाजपचे महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०१९ व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली आहे.
इंडियन नॅशनल काँग्रेसने त्यांच्या @INCIndia या अधिकृत ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटसोबत #BhaktCharitra या हॅशटॅगसह २ मिनिट १६ सेकंदाचे एक गाणे जोडले आहे. या ट्विटमधील गाण्यात भगव्या रंगाचा वापर करून हिंदू धर्मीय हिंसक कारवायांमध्ये गुंतले असल्याचे सुचवले आहे. गाण्याचे बोल व चित्रण असत्य, बदनामीकारक, हिंदू धर्माची बदनामी करणारे, धार्मिक असंतोष व तेढ निर्माण करणारे आहे. हिंदू दहशतवादाची संकल्पना अप्रत्यक्षरित्या मांडणारे आहे. अशा कथित दहशतवादाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खतपाणी घालत असल्याचे सुचविणारे हे गाणे निंदाजनक व निषेधार्ह आहे, असे तावडे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहलेल्या पत्रात नमूद केले आहे.
निवडणूक प्रक्रिया चालू असताना अशा प्रकारचे ट्विट करणे हा प्रचाराचाच भाग आहे. त्यामुळे हे ट्विट निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आणि लोकप्रतिनिधी कायद्याचेही उल्लंघन करणारे असल्याची बाब तावडे यांनी निदर्शनास आणून दिली आहे.