मुंबई - म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2014, 2016 आणि 2018 च्या लॉटरीतील पात्र विजेत्यांना अखेर म्हाडाने मोठा दिलासा दिला आहे. या विजेत्यांना घराची रक्कम भरण्यासाठी 15 डिसेंबर 2020 पर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत नुकतीच संपली असून आजही अनेक पात्र विजेते रक्कम भरू शकलेले नाही. त्यामुळे या विजेत्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने आता 15 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
विजेत्यांच्या मागणीनुसार याआधी देण्यात आली होती मुदतवाढ
म्हाडा लॉटरीत घर लागल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करत पात्र विजेत्यांना देकार पत्र पाठवत घराची रक्कम भरावी लागते. ही रक्कम भरण्यासाठी निश्चित अशी मुदत आणि टप्पे देण्यात येतात. या वेळेत पात्र विजेत्यांनी घराची रक्कम न भरल्यास त्याचे घर रद्द होते. त्यामुळे मुदतीत घराची रक्कम भरणे अत्यंत आवश्यक असते. असे असताना कोरोना आणि लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका सर्वच उत्पन्न गटातील लोकांना बसलेला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांचा पगार कमी झाला आहे. ही बाब लक्षात घेत म्हाडाच्या कोकण मंडळाने 2014, 2016 आणि 2018 च्या लॉटरीतील पात्र विजेत्यांना घराची रक्कम भरण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली. त्यानुसार आता शेवटची मुदत ही 15 डिसेंबरपर्यंत होती.
म्हणून पुन्हा मुदतवाढ
15 डिसेंबरला घराची रक्कम भरण्यासाठीची मुदत संपली. मात्र या मुदतीत मोठ्या संख्येने विजेते घराची रक्कम भरू शकलेले नाहीत. त्यामुळे आता या विजेत्यांचे घर रद्द होणार होते. त्यामुळे कोरोनाचा विचार करता आणखी मुदतवाढ द्यावी अशी मागणी विजेत्यांकडून केली जात होती. ही मागणी लक्षात घेता आता 15 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत विजेत्यांनी घराची रक्कम भरावी आणि आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन म्हाडाने केले आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळ लॉटरीतील विजेत्यांना खुशखबर! घराची रक्कम भरण्यासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ
म्हाडाने कोकण मंडळ लॉटरीतील विजेत्यांना घराची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देत मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाकडून हा दिलासा देण्यात आला आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळ लॉटरीतील विजेत्यांना खुशखबर!