मुंबई : वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली नीट (यूजी) ही सामायिक प्रवेश परीक्षा देशभरात आज (रविवार) सुरू झाली. मुंबईत मात्र, या परीक्षेचे केंद्र ऐनवेळी बदलल्याने त्याचा फटका पालक आणि विद्यार्थ्यांना बसला. यामुळे पालकांकडून यासाठी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलल्याने नीटच्या परीक्षेत गोंधळ नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) आज देशभरात नीट (यूजी)चे आयोजन करण्यात आले आहे. देशात एनटीएकडून आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेची काही केंद्रे दोन दिवसांपूर्वी बदलण्यात आली होती. मात्र, या बदललेल्या केंद्राची पालकांना नीट माहिती न दिल्याने त्याचा मोठा फटका आज पालकांना बसला. यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षेपासून मुकण्याची भीतीही व्यक्त पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
एनटीएकडून मुंबईतील निर्मला निकेतन महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र बदलून ते चुनभट्टी जवळील एव्हराड नगर येथे असलेल्या वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये देण्यात आले होते. परंतु, हे परीक्षा केंद्र बदलत असताना एनटीएकडून मुंबईतील पत्ता देण्याऐवजी त्यामध्ये 'नवी मुंबई' असा पत्ता देण्यात आला होता. यामुळे पालकांची फार मोठी गैरसोय झाली. तर, वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अर्ध्याहून अधिक विद्यार्थी वेळेत पोहोचू शकले नसल्याची माहिती पालकांकडून देण्यात आली. उल्हासनगरहून नवी मुंबईपर्यंत पत्ता शोधून शेवटी एव्हराड नगर येथे पोहोचलेल्या मदन उज्जैनकर या पालकानेही बदलण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर तीव्र नाराजी व्यक्त केली. नेपियेन्सी रोड येथून आलेले विठ्ठल उंबरकर यांनीही आपल्याला पत्ता बदलण्याची माहितीच नव्हता, त्यामुळे निर्मल निकेतन महाविद्यालयापासून इकडे येण्यासाठी खूप वेळ गेला आणि मानसिक त्रास झाला असे सांगितले. तर, देण्यात आलेल्या परीक्षा केंद्राचा पत्ता चुकीचा असल्याने उंबरकर यांनी एनटीएने केलेल्या या चुकीबद्दलही नाराजी व्यक्त केली.
देशभरातून नीट (यूजी)साठी 15 लाख 97 हजार 433 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर, ही परीक्षा 3 हजार 842 परीक्षा केंद्रांवर घेतली जात आहे. या परीक्षेला राज्यातून 2 लाख 28 हजार 914 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर ही परीक्षा 615 केंद्रावर घेतली जात असून मुंबईत एक, नांदेड, नागपूर प्रत्येकी दोन आणि नाशिक जिल्ह्यातील देवळाली व सटाणा तालुक्यातील एक परीक्षा केंद्र बदलण्यात आले होते.
हेही वाचा -रामदास आठवलेंनी घेतली मदन शर्मा यांची भेट; न्यायासाठी गृहमंत्री शाह यांना घालणार साकडे