मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Legislative Council elections) जाहीर झाली आहे. यामध्ये नाशिक व अमरावती विभाग पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्जांची मुदत : महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्यसंख्या ही 78 आहे. त्यामध्ये आता पदवीधरच्या दोन आणि तीन शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यामध्ये आता सामना पाहायला मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवरच आता सर्वच पक्षात हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासाठी 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. यामध्ये नाशिक आणि अमरावती विभाग पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ अशी ही निवडणूक असणार आहे. सध्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे हे आमदार होते. तर अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे रणजीत पाटील हे आमदार होते. तसेच औरंगाबाद शिक्षक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे हे आमदार होते. तर कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये बाळाराम पाटील आणि नागपूर शिक्षक मतदारसंघामध्ये नागो गाणार हे आमदार होते.