मुंबई -मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील मार्केटमधील जीवनावश्यक वस्तुंची विक्री पूर्वीपासूनच सुरू होती. त्यासोबत आता इतर वस्तू, साहित्य विक्रीची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्केटमधील दोन्ही बाजूची दुकाने सम-विषम तारखेस आळीपाळीने सुरू करताना आणि दैनंदिन व्यवहार करताना व्यापारी, विक्रेते, ग्राहक यांच्यासह सर्वांनी कोव्हिड-१९ संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. त्यादृष्टिने सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबई महापालिका हद्दीमध्ये बाजार विभागाच्या अखत्यारित ९२ किरकोळ मंड्या, १६ खासगी मंड्या व ९५ मंड्या आरक्षणाअंतर्गत प्राप्त झाल्या आहेत. देशभरात कोविड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च पासून टाळेबंदी लागू करण्यात आली. तेव्हापासून बृहन्मुंबईतील बाजार विभागाच्या अखत्यारितील मंडयांमधील अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू, सेवा देणाऱ्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने बंद करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईमध्ये २ जूनपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली दुकाने सम व विषम तारखेस खुली करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.
आदेशाच्या अनुषंगाने विविध मार्केटमधील व्यापारी संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींनी मं इतर दुकाने सुरू करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला लेखी विनंती केली. कोविड १९ संसर्ग वाढू नये यासाठी शासनाच्या अटी व शर्तींचे पालन करून मंडईतील दुकाने सुरू करण्यास या संघटनांनी सहमती दर्शवली आहे. मास्क-हॅण्ड ग्लोव्हज्, सॅनिटायझर यांची व्यवस्था करणे, प्रत्येक व्यक्तिचे शारीरिक तापमान तपासणे, सुरक्षित अंतर राखणे या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. आवश्यकता भासल्यास मंडईमध्ये गर्दी नियंत्रणात करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात खासगी सुरक्षा रक्षक नेमणे आदी उपाययोजना करून प्रशासनाला सहकार्य करण्यात येईल, असे या विविध संघटनांनी मान्य केले आहे.