मुंबई - राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीसाठी आवश्यक सेवेची अट १५ वर्षांवरून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी ५ वर्षांवरून २ वर्ष करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
मंत्री आदित्य ठाकरे यांनी मानले गृहमंत्र्यांचे आभार
या निर्णयासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या विनंतीवरुन एसआरपीएफ जवानांच्या या प्रश्नाबाबत समितीही गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार आज झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे. तसेच या निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांचे मनोबल उंचावणार असून त्यांना अधिक कार्यक्षमतेने कर्तव्य बजावण्यासाठीही प्रोत्साहन मिळणार आहे.