मुंबई- मालाडमधील पिंपरी पाडा येथील पालिकेच्या जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणातून बोध घेऊन पालिकेने मुंबईतील जलाशयाच्या संरक्षक भिंतींच्या देखभालीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. मोडकळीस आलेल्या रावळी, बोरीवली येथील जलाशयाच्या भिंतीमुळे मालाडसारखी दुर्घटना घडू नये, म्हणून या भिंतींचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. यासाठी सुमारे 6 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला.
मुसळधार पावसात मंगळवारी मध्यरात्री मालाड येथे संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २६ जणांचा मृत्यू तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले. या भिंतीच्या बाजूला वनविभागाच्या जागेत असलेल्या झोपड्यांवर भिंत कोसळून अपघात झाला. पावसाच्या पाण्याच्या दाबाने ही भिंत पडली असली तरी उंचीच्या मानाने भिंतीची जाडी कमी होती, असे निदर्शनास आले आहे. या अपघाताप्रकरणी कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
संरक्षक भिंतींच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने मुंबईतील संरक्षक भिंतींच्या देखभाल व मजबुतीकरणाकडे अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. अँटॉप हिल, रावळी कॅम्प आणि बोरिवली येथे बांधण्यात येणाऱ्या जलाशयांच्या भिंतींचे क्राँक्रिटीकरण करून या भिंती मजबूत केल्या जाणार आहेत.
एफ उत्तर विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या सायन रावळी जलाशयची १९९८ मध्ये बांधण्यात आलेली संरक्षक भिंत विटांची आहे. ही भिंत सध्या मोडकळीस आली आहे. येथे होणारे अतिक्रमण थांबविण्यासाठी काँक्रेटची उंच भिंत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 2 कोटी 87 लाख 70 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. तर दहिसर, कांदिवली, बोरिवली या पूर्व भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या आर - मध्य विभागातील बोरिवली जलाशयाची सध्या अस्तित्वात असलेली दगडी भिंत १९९२ साली बांधण्यात आली आहे. ही भिंतही सध्या मोडकळीस आली आहे. येथेही अतिक्रमणे व दुर्घटना होऊ नये, म्हणून काँक्रीटची उंच भिंत बांधण्यात येणार आहे. या भिंतीसाठी 4 कोटी 70 लाख 91 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.