मुंबई -शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे एक शब्दही आपल्या प्रचारांच्या भाषणात काढत नाहीत. त्यांना सर्वसामान्य जनतेची कोणतीही फिकिर नाही. केवळ अदानी-अंबानी यांना मदत करून देशातील सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करण्याचे यांचे धोरण आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपला सत्तेतून घालविणे हा एकच पर्याय आहे, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ. डी. राजा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीनंतर आपण आता विधानसभेच्या रणधुमाळीत राज्यात आला आहात, राज्यातील या विधानसभा निवडणुकीकडे आपण कसे पाहता?
कॉ. डी. राजा - मी माझ्या डाव्या पक्षांची भूमिका मांडण्यासाठी आलो आहे आणि ती मी मांडणार आहे. राज्यात जी निवडणूक सुरू आहे, त्यातून मी याविषयी इतकेच सांगेन की, राज्यात असलेली भाजप-सेना युती येथील जनतेनी यांना सत्तेतून घालवले पाहिजे. तसेच दुसरीकडे नवीन राजकीय पर्याय उभे राहण्याची गरज आहे आणि या पर्यायासाठी आम्ही लढत आहोत.
राज्यात निवडणुकांमध्ये भाजपकडून काश्मीर आणि ३७० कलम यांचा विषय समोर केला जातोय, त्यावर आपण काय सांगाल?
कॉ. डी. राजा - राज्याचे आणि देशाचे हेच मोठे दुर्भाग्य आहे. निवडणूक ही राज्यातील असताना अशा प्रकारचे मुद्दे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह हे उपस्थित करत आहेत. परंतु हेच लोक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर मात्र, एक शब्दही बोलत नाहीत. नाशिक ते मुंबईपर्यंत शेतकऱ्यांनी एक पायी पदयात्रा काढली, परंतु या सरकारने त्यांच्या तोंडाला पाने पुसली. 'सबका साथ, सबका विकास' म्हणणारी भाजप ही देशातील, राज्यातील शेतकऱ्यांसोबत नाही, हे यातून स्पष्ट होते. भाजप केवळ उद्योगपती आणि अदानी- अंबानी यांना मदत करत असून त्यांच्यासाठीच काम करताना दिसते. त्यामुळे देशातील शेतकरी, तरुण, बेरोजगार आणि युवकांसाठी ते काहीही बोलत नाहीत. म्हणूनच, आमच्या डाव्या पक्षांसोबत राज्यातील विरोधी पक्षांनी या निवडणुकीत हे मुद्दे लावून धरले पाहिजे.