मुंबई :मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शहरातून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी दोन ते तीन तासाचा कालावधी लागतो. यासाठी सागरी किनार सेतू मार्ग म्हणजेच कोस्टल रोड बांधला जात आहे. १०.५८ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर दोन्ही बाजूला २ किलोमीटरचे दोन बोगदे बांधण्यात येत आहेत. यापैकी एक बोगदा १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाला आहे. दुसऱ्या बोगद्याचे काम १५ मार्च पर्यंत पूर्ण होईल असे पालिका आयुक्तांनी घोषित केले होते. मात्र बोगदा खणत असलेल्या मावळा या टीबीएम मशीनच्या मेंटेनंसमुळे कामाला उशीर लागत आहे. आजही १६० मीटर बोगदा खोदण्याचे काम बाकी आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल, अशी शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
रस्त्याचे ७२ टक्के काम पूर्ण :मुंबई शहारातील प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी लिंक या दरम्यान १०.५८ किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड बांधण्याचे काम सुरु आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये याचे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. आतापर्यंत ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर तीन हात असणार आहेत. त्यामधील दोन हातांचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. तर कोस्टल रोडच्या पिलर क्रमांक ७ आणि ९ मधील अंतर १२० मीटर ठेवण्याचा निर्णय झाला आहे. वरळी कोळीवाडा येथील दोन पिलारमधील अंतर वाढवल्याने येथील हाताचे काम पूर्ण व्हायला उशीर होणार आहे. ते काम २०२४ मध्ये पूर्ण होणार आहे.