नवी दिल्ली : सुप्रिम कोर्टातील सुनावणीच्या वेळी लंच ब्रेक नंतर शिंदे गटाचे वकील आपली बाजू मांडणार होते. यावेळी यासंदर्भातील सुनावणी याच आठवड्यात पूर्ण करण्याचा मानस सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी आज आणि उद्या दोन दिवसात युक्तीवाद पूर्ण करण्याच्या सूचना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्यासह इतरांना दिल्या. गुरुवारपर्यंत सॉलिसिटर जनरलसह सर्वांचा युक्तीवाद पूर्ण करण्याचा सुप्रीम कोर्टाचा प्रयत्न असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले.
तत्पुर्वी झालेल्या सुनावणीत व्हीप ठरवण्याचा संसदीय कामकाजाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्ट मत ठाकरे गटाचे वकील कामत यांनी कोर्टापुढे सांगितले. दुसरी गोष्ट म्हणजे हे साधे अनियमिततेचे प्रकरण नाही तर हे घटनात्मक प्रकरण आहे असाही दावा वकील कामत यांनी केला. कामत यांनी दहाव्या परिशिष्टाच्या अनुषंगाने सभागृहात काय-काय अनियमितता झाल्या आहेत, यासंदर्भातील युक्तीवाद केला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काही निरीक्षणे मांडली, तसेच प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये जोपर्यंत राज्यपालांना किती आमदार अपात्र आहेत ते समजत नाही तोपर्यंत ते काही करू शकत नाहीत. तसेच सभापतींद्वारे अपात्रतेचा निर्णय घेतल्यानंतर राज्यपालांना किती आमदार कुणाकडे ते आकड्यांमधील स्पष्टतेमधून समजू शकते, असेही ते म्हणाले. तर ही गोष्ट राज्यपाल करु शकत नाहीत असे ठाकरे गटाच्या वतीने सिंघवी यांनी स्पष्ट केले. पक्ष आणि पक्षाचे नेते यामध्ये फरक केला पाहिजे असा युक्तवाद यावेळी सिंघवी यांनी केला. राज्यपालांनी फक्त निवडून आलेल्या नेत्यांचा विचार करुन चालत नाही असेही सिंघवी यांनी सरन्यायाधीशांनी मांडलेल्या निरीक्षणावर उत्तर दिले.
सिंघवी यांच्या जोरदार युक्तीवादानंतर सरन्यायाधीशांसह इतर न्यायमूर्तींनी आपसात चर्चा केली. सिंघवी यांनी घटनात्मक बाबी तसेच पक्षांतर बंदी संदर्भातील तरतुदींचा पाढाच कोर्टापुढे वाचला. त्यानंतर कोर्टात न्यायमूर्तींची आपसात चर्चा झाली. ठाकरे गटाचे वकील डॉ. अभिषेक मनू सिंघवी यांनी तत्कालीन राज्यपालांच्या निर्णयावर अनेक आक्षेप नोंदवले. राज्यपालांनी ठाकरे सरकार पाडण्याच्या अनुषंगाने घटनात्मक तरतुदी बाजूला ठेवून निर्णय घेतल्याचा आरोप सिंघवी यांनी केला. त्यासाठी त्यांनी काही घटनात्मक बाबींचा पुरावाही दाखवून दिला. कोर्टाने काही निर्देश देऊनही त्यांनी मनमानी केली असा थेट आरोप करुन त्यांच्यावर कोर्टाच्या अनादराची नोटीस काढावी अशीही मागणी सिंघवी यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात 27 जून रोजीची परिस्थिती येते त्यामुळे हे न्यायालय निर्णय देण्यास सक्षम आहे असा युक्तीवाद ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात येत आहे. हे प्रकरण असे आहे की जिथे फक्त सर्वोच्च न्यायालयच निर्णय घेऊ शकते. हे प्रकरण इतर कोणाकडेही सोपवू नये असेही सिंघवी यांनी स्पष्ट केले. आताच योग्य निर्णय घेतला नाही तर आपल्या घटनात्मक राजकारणावर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होतील असेही सिंघवी म्हणाले. सर्वच गोष्टी तुमच्या न्यायिक क्षेत्रामध्ये येत आहेत. त्यामुळे योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी सिंघवी यांनी लावून धरली.