मुंबई - गोरेगाव परिसरातील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भरत भाई पटेल कंपाऊंडमध्ये १० जुलै रोजी दीड वर्षाचा दिव्यांश गटारात पडून वाहून गेला होता. तेव्हापासून दिव्यांशचा शोध घेतला जात होता. मात्र, दिव्यांश अद्याप सापडला नसल्याने त्याला मृत मानत त्याच्या वडिलांनी दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
दिव्यांशच्या मृत्यू प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - filed the complaint
पावसाळा असल्यामुळे वेळोवेळी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना रस्त्यावरील गटारावर झाकण नसल्याची दिव्यांशच्या वडिलांनी तक्रार केली होती. मात्र, यासंदर्भात कुठलीही कारवाई न झाल्यामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
गटारात वाहून गेल्यानंतर दिव्यांशसाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, या मोहिमेला अद्याप यश न आल्याने दिव्यांशच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी कलम ३०४ अनुसार गुन्हा दाखल केला आहे. आपल्या तक्रारीमध्ये दिव्यांशचे वडील सुरज भान सिंह यांनी म्हटले आहे की, पावसाळा असल्यामुळे वेळोवेळी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना रस्त्यावरील गटारावर झाकण नसल्याची त्यांनी तक्रार केली होती. मात्र, यासंदर्भात कुठलीही कारवाई न झाल्यामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. यासाठी गटाराची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असणारे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.