मुंबई Complaint against Lalbagh Raja Mandal : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून आणि सुरक्षारक्षकांकडून होणाऱ्या भाविकांना धक्काबुक्की प्रकरणी वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी जर पोलिसांनी काही कारवाई केली नाही तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती वकील आशिष राय यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे. (Advocate Ashish rai and Pankaj Mishra)
मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार -लालबागच्या राजाच्या दरबारात महिला आणि लहान मुलांसारख्या भाविकांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दोन वकिलांनी दाखल केली आहे. नुकताच एका लाल टी-शर्ट मध्ये असलेल्यानं एका महिलेची कॉलर पकडून तिला धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याचप्रमाणे चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवलेला व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर वायरल झाला होता, त्याचा संदंर्भ देऊन वकिलांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
बेजबाबदार व्यवस्थापन -‘लालबागचा राजा’च्या मंडपामध्ये मुले, महिला आणि वृद्ध भाविकांसोबत दिवसेंदिवस घडणाऱ्या धक्काबुक्कीच्या घटनांबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय, पंकज मिश्रा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य प्रशासन, मुंबई पोलीस प्रशासन आणि स्थानिक मंडळ व्यवस्थापक यांच्या बेजबाबदार व्यवस्थापन वृत्तीमुळे सामान्य भाविकांवर होत असलेले अमानुष कृत्य आणि घटनात्मक सुरक्षा व्यवस्थेकडे होत असलेल्या दुर्लक्षावर जोरदार आवाज उठवण्यात आला आहे.