मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी ट्रकवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रक वाहतूक पुन्हा सुरू होऊ शकेल. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून अडविण्यात येणार नाही, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोधकुमार आदींसह संबंधित विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीवापराचे ट्रॅक्टर, हार्वेस्ट्रर आदी वाहनांना पुरेसे पेट्रोल, डिझेल उपलब्ध करून देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.