मुंबई- महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्यावर, त्यांना सौम्य लक्षणे असताना, इतर नागरिकांप्रमाणे त्यांना होम क्वारंटाईन का केले नाही?, त्यांचा आणि नानावटी रुग्णालयाचा संबंध काय? जास्त बिल घेणाऱ्या नानावटी रुग्णालयाला उच्च न्यायालयाने झापल्याने नानावटीची बदनामी रोखण्यासाठी अमिताभ अॅडमिट झाले का? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत. याबाबत पालिकेने अमिताभ यांना सौम्य लक्षणे व इतर आजार असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. तर अमिताभ यांच्या प्रमाणेच सामान्य नागरिकांवरही खासगी रुग्णालयात उपचार करावेत, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी यांनी केली आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक, ऐश्वर्या व आराध्या यांना कोरोना झाला आहे. हे चौघेही असिंटोमॅटिक आहेत. तरीही त्यांच्यापैकी अमिताभ व अभिषेक यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ऐश्वर्या आणि आराध्या यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यावरून सोशल मीडियावर अमिताभ यांना ट्रोल केले जात आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडे पैसा आणि चार बंगले असताना ते खासगी रुग्णालयात का दाखल झाले. ज्या नानावटी रुग्णालयात दाखल झाले त्या रुग्णालयाकडून कोरोना रुग्णांकडून जास्त पैसे उकळले जात होते. त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. याच रुग्णालयात बच्चन यांनी गुंतवणूक केली असून नानावटी रुग्णालयाची झालेली बदनामी भरून काढण्यासाठी बच्चन रुग्णालयात दाखल झाल्याची चर्चा सोशल मीडियामध्ये आहे.
आयसीएमआरच्या गाईडलाईन प्रमाणे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात येते. मुंबईत अशा लाखो रुग्णांना सरकारी क्वारंटाईन सेंटरमध्ये किंवा घरातच क्वारंटाईन केले जाते. मात्र अमिताभ व अभिषेक या दोघांना नानावटी सारख्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधला असता सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना पालिका होम क्वारंटाईन केले जाते. मात्र अमिताभ यांना सौम्य लक्षणे असली तरी त्यांना इतर आजार आहेत. इतर आजार असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाते, त्याप्रमाणे अमिताभ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अभिषेक बच्चन यांच्या रिपोर्टमध्येही सौम्य लक्षणे दाखवली आहेत. त्यामुळे त्यांनाही रुग्णालयात देखरेखीखाली ठेवल्याचे काकाणी यांनी सांगितले. नानावटी रुग्णालयाची जी कागदपत्रे पालिकेकडे देण्यात आली आहेत, त्यात बच्चन कुटूंबीय रुग्णालयात संचालक किंवा ट्रस्टी असल्याचे सिद्ध होत नाही. यामुळे बच्चन आणि नानावटीमधील गुंतवणुकीबद्दल बोलणे योग्य ठरणार नाही, असे काकाणी यांनी सांगितले.
श्रीमंत आणि गरीब भेदभाव नको -अमिताभ असो की इतर भारतीय नागरिक असो सर्वावर उपचार व्हायला पाहिजेत. अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटात कुली, टॅक्सी चालक, कामगार अशा भूमिका केल्या आहेत. त्या शोषित कामगारांनावरही खासगी रुग्णालयात उपचार व्हायला पाहिजेत. त्यासाठी पालिका आणि राज्य सरकारने सुपर स्पेशालिटी रुग्णालये ताब्यात घ्यायला हवीत. जीडीपीच्या 10 टक्के रक्कम आरोग्य यंत्रणेवर खर्च करण्याची गरज आहे. गरीब आणि श्रीमंत अशा दोघांवर कोरोनाबाबतचे समान उपचार व्हायला हवेत, असे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे प्रकाश रेड्डी यांनी म्हटले आहे.