मुंबई:नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि आदिवासी बांधवांनी कॉम्रेड जेपी गावित यांच्या अध्यक्षतेखाली काढलेल्या भव्य मोर्चाला मुंबईच्या वेशीवर थांबवण्यात आले आहे. आंदोलन नेत्यांशी काल झालेल्या चर्चेनंतर नेमक्या कोणत्या मागण्या सकारात्मक रित्या मान्य केल्या गेल्या आहेत आणि त्याबाबत सरकारने काय कार्यवाही केली याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. कॉम्रेड जेपी गावित आणि आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावर येत असलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबत सरकार संवेदनशील आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेत्यांशी गुरुवारी चर्चा केली होती. त्यानुसार या संदर्भातील निवेदन सभागृहात मांडण्यात येईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे आज सभागृहात निवेदन करण्यात आले. आदिवासी बांधव भगिनी यांच्या अनेक वर्षांपासून मागण्या प्रलंबित असून त्यांना न्याय देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे ट्विट: ट्विटर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जेपी गावित यांच्या नेतृत्वाखाली लाँग मार्च काढण्यात आला. आम्ही त्यांच्याशी बोललो. 14-15 मुद्दे होते आणि त्यातील काहींवर निर्णय घेण्यात आले. निर्णयांची अंमलबजावणीही केली जाईल. म्हणूनच मी जेपी गावित आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यासह अन्य मागण्यांसाठी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती महिनाभरात अहवाल तयार करून सरकारला सादर करेल. या समितीमध्ये संबंधित मंत्री आणि आमदार विनोद निकोले आणि माजी आमदार जेपी गावित यांचा समावेश असेल, अशी माहितीसुद्धा विधानसभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
काय घेतले निर्णय?आदिवासी बांधवांच्या कब्जात असलेली चार हेक्टर पर्यंतची जमीन कसणाऱ्यांच्या नावे लावावी. अपात्र दावे मंजूर करावे, देवस्थान आणि गायरान जमिनीत असणाऱ्यांच्या नावे कराव्यात. वन हक्क संदर्भात अनेक प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक करावी. कमी क्षेत्रामध्ये ज्यांची नावे लागली आहेत ती कायम करावीत तसेच शेतकरी आणि आदिवासींना शासकीय योजनांचे लाभ मिळावेत. अशा एकूण 14 प्रमुख मागण्या आंदोलकांच्या होत्या. या संदर्भात सरकार सकारात्मक असून त्या सोडवण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये मंत्र्यांसहित प्रशासकीय अधिकारी आणि माजी आमदार जेपी गावित आणि आमदार विनोद निकोले यांचाही सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. ही समिती एक महिन्यात आपला अहवाल देणार आहे. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.