महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कँडीक्रश'चा खेळ भोवला, सहकार आयुक्त निलंबित - Satish Soni suspended in mumbai

कर्जमाफीसाठी तयार केलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना 2019’ योजनेची लिंक उघडताच कँडीक्रश ही गेम सुरू होत होती. यामुळे प्रभारी सहकार आयुक्त सतिश सोनी यांना निलंबित करण्यात आले आहे.

सतीश सोनी
सतीश सोनी

By

Published : Jan 22, 2020, 11:23 PM IST

मुंबई- राज्य सरकारने सुरू केलेली ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त ही योजना एका भलत्याच कारणाने चर्चेत आली आहे. या कर्जमाफीसाठी तयार केलेली वेबसाईट लिंक ही कँडीक्रश या मोबाईल गेमवर जात असल्याचे लक्षात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराचा ठपका प्रभारी सहकार आयुक्त सतिश सोनी यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

सतीश सोनी यांच्याकडे गेली काही महिने या सहकार आयुक्त या पदाचा अतिरिक्त पदभार होता. त्यांच्या निलंबनानंतर नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांच्याकडे या पदाचा पूर्णवेळ कारभार दिला आहे. अशी चुकीची लिंक ही नजरचुकीने दिली असली जाऊ शकेल किंवा सरकारच्या बदनामीचा कट यामागे असण्याची शक्यता सोनी यांच्या निलंबनाच्या आदेशात नमूद करण्यात आली आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना २०१९ साठी सहकार आयुक्तांनी दोन पत्रे तयार केली होती. या पत्रामध्ये योजनेच्या अचूक वेबसाइटची लिंक त्यांनी कृषी खात्याला दिलेली होती. मात्र, ही लिंक चुकीची असल्याचे निदर्शनास आले. ती लिंक उघडल्यास कँडिक्रश हा मोबाईल गेम उघडला जात असल्याचे लक्षात आल्याने कृषी खात्याने याबाबत सरकारला कळविले होते.

राज्यसरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सोनी यांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित होते. तसेच कृषी खात्याला लिंक पाठविताना त्याची खात्री करून घेणे आवश्यक होते. त्यांनी केलेली ही चूक अनावधानाने झाली नसून ही हेतुपुरस्सर झाली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा - बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी मतदानापासून राहणार वंचित

तसेच त्यांच्या या चुकीमुळे योजनेची बदनामी झालीच शिवाय सरकारला विविध पातळीवर खुलासे करावे लागले. सहकार आयुक्तांनी त्यांच्या कामात अक्षम्य हलगर्जीपणा, दुर्लक्ष व बेजबाबदारपणा दाखविला आहे. याबाबत त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना 21 जानेवारीपासून निलंबित करण्यात येत आहे, असे या आदेशात म्हटले आहे.

सहकार विभागाकडून शेतकरी कर्जमुक्ती संदर्भात तयार करण्यात आलेल्या लिंकच्या स्पेलिंग मध्ये टाईप करताना नजरचुकीने आलेल्या स्पेसमुळे सहकार आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) सतीश सोनी यांना सहकार आयुक्तांनी निलंबित केले आहे.


शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी सहकार विभागाने ऑनलाईन वेबसाईट तयार केली होती. त्याची लिंक कृषी आयुक्तांना पाठविण्यात आली. मात्र, लिंक पत्रात टाईप करताना चुकून स्पेस दिली गेली. लिंक उघडल्यावर चक्क कँडीक्रश गेम उघड होत आहे. कृषी विभागानेही ही लिंक चेक न करता ती सगळीकडे फॉरवर्ड केली आहे. त्यामुळे याला कृषी विभागाला जबाबदार न धरता केवळ सहकर आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) यांना जबाबदार धरुन निलंबनाची कारवाई राज्य सरकारने केली असल्याचे सहकार विभागातील सूत्रांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा - 'कोरेगाव भीमा चौकशी समितीचा उद्या अहवाल'

ABOUT THE AUTHOR

...view details