मुंबई :स्वतःच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर नेमल्याने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल चर्चेत आले आहेत. पालिका आयुक्त मनमानी कारभार करत असल्याचा आरोप भाजपकडून याआधीही करण्यात येत होता. आता थेट आयुक्त धनदांडग्या आणि बिल्डरांच्या सोयीसाठी सभा घेतात, असा आरोप भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.
मुंबई पालिका आयुक्त धनदांडग्या आणि बिल्डरांच्या सोयीसाठीच सभा घेतात : भाजप - Prabhakar Shinde BJP group leader news
मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल हे धनदांडग्या आणि बिल्डरांच्या सोयीसाठी सभा घेतात. मात्र, ज्या ठिकाणी मुंबईकर नागरिकांची कामे होतात. त्या वैधानिक समित्यांच्या बैठका घेत नाहीत, असा आरोप भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.
या आरोपाबाबत बोलताना, कोरोनाच्या संकटाच्या नावाने शहरात अनेक कामे नियम डावलून सुरू आहेत. याचा जाब विचारला जाईल यांच्या भीतीने पालिका आयुक्त कोणत्याही लोकप्रतिनिधीला सामोरे जात नाहीत. 31 मार्चपासून एकाही वैधानिक समितीची बैठक पालिकेत घेण्यात आलेली नाही. याबाबत अनेक पत्रही दिली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 1 एप्रिलला महापालिकेच्या वैधानिक समितीवरील सदस्य नियमाप्रमाणे निवृत्त झालेले आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या सदस्यांची नियुक्ती झालेली नाही. 3 जुलैला याबाबत महापौर आणि पालिका आयुक्तांना पत्र दिले. मात्र, त्यावर अद्याप उत्तर दिलेले नाही असेही शिंदे यांनी सांगितले.
पालिकेत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेताना लोकप्रतिनिधींशी चर्चा केली जाते, तसे संकेत आहेत परंपरा आहे. मात्र, ते पाळले गेलेले नाहीत. केवळ 3 ऑगस्ट रोजी वृक्ष प्राधिकरण समितीची सभा घेण्यात आली. त्याचे अध्यक्ष आयुक्त आहेत. त्यात बेकायदेशीर प्रस्ताव आणण्यात आले. हे कोणाच्या सोयीसाठी, असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला आहे. आयुक्त धनदांडग्या आणि बिल्डरांच्या सोयीसाठी सभा घेतात. मात्र, ज्या ठिकाणी मुंबईकर नागरिकांची कामे होतात. त्या वैधानिक समित्यांच्या बैठका घेत नाहीत, हे आजचे विदारक सत्य असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.