मुंबई -‘भिरकीट’ या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, कुशल बद्रिके, सागर कारंडे, मोनालिसा बागल, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद, श्रीकांत यादव, मीनल बाळ, शिल्पा ठाकरे, दिप्ती धोत्रे, आर्या घारे, सेवा मोरे, रोहित चव्हाण, बाळकृष्ण शिंदे, नामदेव मिरकुटे, राधा सागर, अश्विनी बागल यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. हे सगळेच कलाकार आपल्या धमाल विनोदी शैलीने चित्रपटगृहात अक्षरशः हास्यकल्लोळ करणार आहेत.
गिरीश कुलकर्णी वेगळ्या भुमिकेत - या चित्रपटात गिरीश कुलकर्णी हे एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ते या चित्रपटात 'तात्या' ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. जो नेहमीच सर्वांच्या मदतीला धावून जाणारा आहे. गावातील प्रत्येक स्त्री तिची व्यथा घेऊन 'तात्या'कडे सोडवायला जाते. असा हा सदैव सेवेसाठी तत्पर असणारा 'तात्या' प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवणार असून अशा प्रकारची भूमिका गिरीश कुलकर्णी यांनी पहिल्यांदा साकारली आहे. तर सागर कारंडे आपल्याला एक धमाल राजकारण करताना दिसणार आहे. तो 'बंटी दादा' ही भूमिका साकारत आहे. याव्यतिरिक्त हृषिकेश जोशी, कुशल बद्रिके, तान्हाजी गालगुंडेही आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांना लोटपोट हसवणार आहेत. या चित्रपटात विनोदाचे बादशाह असल्याने 'भिरकीट' चित्रपटगृहात धुमाकूळ घालणार आहे.