मुंबई- राज्यातील विद्यार्थ्यांना गाडी चालवण्याचा परवाना काढण्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी आणि महाविद्यालयातील जागेचा वापर करण्यासाठी परिवहन विभागाने महाविद्यालयात पोहचण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी स्थानिक पातळीवर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांना पुढाकार घेण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा -वरळीतले पब रात्री उशिरापर्यंत कसे काय सुरू असतात, मनसेच्या संतोष धुरींचा आदित्य ठाकरेंना सवाल
विद्यार्थ्यांना शिकाऊ परवाना मिळेल
राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी मुंबई आणि उपनगरातील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना याबाबत प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आता स्थानिक आरटीओंना संबंधित विभागातील विद्यापीठ किंवा महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना संपर्क साधावा लागणार आहे. त्यानंतर अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांना शिकाऊ परवाना (लर्निंग लायसन्स) मिळवता येणार आहे.
परवाना काढण्याची प्रक्रिया ऑनलाईन करून प्रशासनाने भ्रष्टाचाराचे बहुतांश मार्ग बंद केले आहेत. त्यापुढे जाऊन अधिकाधिक तरुणांना परवाना काढण्याची प्रक्रिया समजावी म्हणून आता महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना आरटीओतील अधिकारी व कर्मचारी परवाना काढण्याचे प्रशिक्षण देतील. त्यासाठी इच्छुक महाविद्यालय किंवा विद्यापीठाला स्थानिक आरटीओसोबत संपर्क साधावा लागेल. परिवहन विभागाचे कर्मचारी व अधिकारी विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करण्यात मदत करतील. सोबतच प्रशिक्षणही देतील, अशी माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली.