मुंबई :मित्राला झालेल्या मारहाणीनंतर गॅंग विरोधात पोलिसांत साक्ष दिल्याच्या रागातून चाैघांनी १९ वर्षीय विद्यार्थ्यावर भररस्त्यात कटरने हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री भांडूपमध्ये घडली. याप्रकरणी भांडूप पोलिसांनी अनिकेत गायकवाड नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गँग विरुध्द साक्ष दिल्याने हल्ला : भांडूप पश्चिमेकडील हनुमान नगर परिसरात रहात असलेला शुभम पाठक (१९) हा ठाण्यातील एका फार्मसी काॅलेजमध्ये शिक्षण घेत आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात शुभमचा मित्र फैजल याला पोलीस अभिलेखावरील आरोपी सुजल जाधव याने मारहाण केली होती. फैजलच्या तक्रारीवरुन भांडूप पोलिसांनी जाधव विरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात शुभमने जाधव विरोधात साक्ष दिली होती. याचाच राग जाधवला होता. तू आमच्या गँग विरुध्द साक्ष देतोस, मी सुटुन आल्यानंतर बघुन घेईन अशी धमकी त्याने शुभमला दिली होती. पूढे जाधवला या गुन्ह्यासह अन्य गुन्ह्यात अटक करण्यात आली. नुकताच तो सुटून जेल बाहेर आला. त्यावेळी त्याने शुभमवर हल्ला केल्याची माहिती मिळते आहे.