मुंबई-मुंबई महानगर क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी आजपासून महाविद्यालयाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यात सर्व महाविद्यालयात असलेल्या व्यवस्थापन कोट्यांच्या आणि ऑनलाइन प्रवेशाच्या जागांची माहिती ऑनलाइन पध्दतीने संकलित केली जाणार आहे. त्यासोबतच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य आणि अकरावी प्रवेशाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कोरोना आणि त्या संदर्भातील पार्श्वभूमी लक्षात घेता यावेळी पहिल्यांदाच हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने होणार असून त्यासाठीचे वेळापत्रक विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रसिद्ध केले आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे 750 हून अधिक कनिष्ठ महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयातील प्रवेशाच्या जागांची नोंदणी पुढील दोन दिवसात केली जाणार आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई, पश्चिम मुंबई, आणि उत्तर मुंबई या भागात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी १ जुलै रोजी पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर ठाणे महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, नवी मुंबई, पनवेल, महानगरपालिका उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर महानगरपालिका या परिसरातील महाविद्यालयांची नोंदणी 2 जुलै रोजी सकाळी 11 ते सायंकाळी चार या वेळात केली जाणार आहे.