मुंबई- शिक्षक आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे. मात्र शिक्षकांच्या मागण्यांवर अजूनही तोडगा न निघाल्याने शिक्षक आक्रमक झाले आहेत. शिक्षकांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, सोमवारी आक्रमक शिक्षकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. सरकारने जर शिक्षकांच्या मागण्यांना दाद दिली नाही, तर ९ सप्टेंबरपासून एकही कॉलेज सुरु होऊ देणार नाही, असा इशारा सर्व शिक्षकांनी दिला आहे.
यावेळी महत्त्वाची बाब म्हणजे, नुकतेच शिक्षक आमदार नागो गाणार आले होते. मात्र, त्यांना संतप्त शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. राज्यातील विना अनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी अर्थ विभागाने तरतूद केली होती. त्यासाठी नेमलेल्या उपसमितीच्या बैठकीनंतर ८ दिवसात कॅबिनेटची बैठक घेऊन अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. त्याचबरोबर येत्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शिक्षकांचे वेतन सुरू होईल, असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिले होते. मात्र, त्याच्या पूर्ततेसाठी मंत्रालयात कोणतीही सकारात्मक हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे अनुदानाची आशा मावळलेल्या शिक्षकांचे मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या पंधरा दिवसांपासून अर्धनग्न आंदोलन सुरू असून काल शिक्षक अधिक आक्रमक झाले होते.
शिक्षक मोठ्या संख्येने आझाद मैदानातून थेट मंत्रालायवर निघाले असताना पोलीस व शिक्षक यांच्यात तणावाची परिस्थिती दिसली. शिक्षक आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला होता. त्यामुळे अशी घटना पुन्हा होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.