मुंबई -तासनतास रखडणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प मनपाने हाती घेतला आहे. येत्या जून २०२३ पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी बोगदा खोदण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, देशातील अत्याधुनिक यंत्रणा असलेले मावळा यंत्राद्वारे दोन वर्षात बोगदे बांधून पूर्ण तयार होतील, असा विश्वास सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता डॉ. विशाल ठोंबरे यांनी दिली.
मावळा मशीन बजावणार महत्त्वाची कामगिरी -
कोस्टर रोडसाठी दोन महाबोगदे खणले जाणार आहेत. या प्रकल्पात मावळा मशीन हे संयंत्र महत्त्वाची कामगिरी बजावणार आहे. टीबीएम मशीनला मावळा असे नाव दिले असून ते देशातील सर्वात मोठे मशीन आहे. महानगरांमधील रस्ते बोगद्यांमध्ये अशा प्रकारची यंत्रणा भारतात पहिल्यांदाच बसविण्यात येणार आहे. या मशीनचे वजन २३०० टन असून सुमारे आठ जंबो जेटच्या वजनाची आहे. तिचा व्यास १२.१९ इतका आहे. बोगदा खोदताना कोणत्याही अचडणींचा सामना करावा लागणार नाही, अशी व्यवस्था यात असेल. प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या 'छोटा चौपाटी'पर्यंत बोगदे खोदले जातील. 'मलबार हिल' च्या खालून बोगदा जाणार आहेत. दोन्ही बोगदे हे जमिनी खाली १० ते ७० मीटर एवढ्या खोलीवर असतील. या दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.०७ किलोमीटर इतकी असणार आहे. सागरी किनारा मार्गाच्या एकूण कामापैकी २० टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. शामलदास गांधी मार्गावरील उड्डाणपूल ते वरळी या दरम्यान १०.५८ किमी लांबीचा हा 'सागरी किनारा मार्ग' असणार आहे. हामार्ग तयार करण्यासाठी अरबी समुद्राखालील तब्बल १७५ एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे. तर अजून १०२ एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकला जाणार आहे. या मार्गावर समुद्राखालून ४०० मीटरचे बोगदे असतील. हे बोगदे खोदण्याचे काम मावळा करेल. महाबोगदे खणण्याची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रियदर्शनी पार्क येथून करण्यात आली.
बोगद्याच्या बांधकामाची वैशिष्ट्ये व आयुर्मान -
भूगर्भातील व वेगवेगळ्या ऋतुंमधील वातावरणातील बदलांचा विचार करुन बोगद्याचे बांधकाम केले जाईल. 'टनेल बोअरिंग मशिनद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बांधण्यात येणारे हे बोगदे भूकंपरोधक देखील असतील. तसेच बोगदा व त्यातील भिंती या अतिउच्च तापमानाला सहन करु शकतील, अशा बांधल्या जाणार आहेत. आग किंवा आपत्कालीन स्थितीत येथील तपमान सहन करण्याची क्षमता या भिंतीत असेल. बोगद्यांमध्ये दोन्ही बाजूला वाहनांच्या सुरक्षेसाठी 'क्रश बॅरियर' तयार केले जाणार आहेत. या बोगद्यांचे आयुर्मान १२० वर्षांचे असेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दोन्ही बोगद्यांना जोडणारे 'छेद बोगदे' (क्रॉस टनेल) -
आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास शेजारी-शेजारी असणाऱ्या या दोन्ही बोगद्यापैकी एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात सहजपणे जाता यावे, यासाठी दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकूण तेरा १३ 'छेद-बोगदे' तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक २५० मीटर अंतरावर असणाऱ्या या छेद-बोगद्यांची लांबी ही साधारपणे ११ ते १५ मीटर असणार आहे. हे छेद-बोगदे केवळ आपत्कालिन परिस्थिती दरम्यान उपयोगात आणले जातील. या १३ छेद-बोगद्यांपैकी ७ छेद-बोगदे हे वाहनांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी; तर उर्वरित ६ बोगदे हे प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी असणार आहेत.
अत्याधुनिक 'सकार्डेा नोझल' यंत्रणा -
'सकार्डेा नोझल' या अत्याधुनिक यंत्रणेंतर्गत दोन्ही बोगद्यांच्या दोन्ही मुखांजवळ वैशिष्ट्यपूर्ण यंत्रे बसविलेली असतील. या यंत्रांद्वारे बोगद्याच्या एका बाजूने हवा अत्यंत तीव्रतेने आतमध्ये ढकलली जाते व बोगद्याच्या दुसऱ्या बाजूने ती बाहेर खेचलीही जाते. बोगद्याची वाहतूक ज्या दिशेने जात असेल, त्याच दिशेने ही हवा आत ढकलली जाते व दुसऱ्या बाजूने बाहेर खेचली जाते. ज्यामुळे बोगद्यातील हवा खेळती राहण्यासोबतच वाहनांमधून सोडला जाणार धूर देखील बोगद्यातून लगेच बाहेर पडतो व प्रदूषण उत्सर्जित होऊन बोगद्यातील वातावरण चांगले राहण्यास मदत होत. तसेच एखाद्या गाडीला आग लागल्यास त्यातून उत्पन्न होणारा धूर देखील या यंत्रणेद्वारे अत्यंत वेगाने बाहेर खेचला जातो. ज्यामुळे धूर बोगद्यात साठत नाही व आपत्कालिन परिस्थितीचे नियोजन करणे सुलभ होते. अशा प्रकारची यंत्रणा भारतात प्रथमच या प्रकल्पात वापरली जाणार आहे.
अग्निशमन यंत्रणा -
आगीची संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी बोगद्यांमध्ये स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा अव्याहतपणे कार्यरत राहणार आहे. यामध्ये बोगद्याच्या अंतर्गत छताला जागोजागी 'स्प्रिंकलर्स' बसविले जाणार आहेत. याचबरोबर 'एबीसी' या प्रकारातील फायर एक्स्टींग्विशर, फायर हायड्रंट, फायर होज रील, फीक्स् फायर सिस्टम इत्यादीबाबी देखील बोगद्यांमध्ये असणार आहेत. त्याचबरोबर संभाव्य आपत्कालीन प्रसंगी या सर्व बाबींसाठी मुबलक प्रमाणात व उच्च दाबाने पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बोगद्यांमधील अग्निशमन यंत्रणेला जोडलेली व नियमितपणे कार्यरत राहणारी स्वतंत्र जलवाहिनीदेखील असणार आहे.