मुंबई - जिद्दीच्या जोरावर महिलांनी तयार केलेला लिज्जत पापड हा जगभर पोहोचला आहे. लिज्जत पापड संस्थेने अनेक महिलांना रोजगार दिला. त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून महाराष्ट्रातील उद्योजक जसवंतीबेन पोपट यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. जसवंतीबेन या 'श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड'च्या सहसंस्थापक आहेत. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील कार्यासाठीचा भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करून सन्मानित केले आहे.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित जसवंतीबेन हेही वाचा -मुंबई : वांद्रे टर्मिनस-रामनगर एक्स्प्रेस २ डबे सोडून पुढे पळाली
जसवंतीबेन पोपट यांनी 45 हजार महिलांचे जीवन बदलले आहे. पद्मश्री पुरस्कारासाठी माझे नाव घोषित झाल्याने मला खूप आनंद होत आहे, अशी भावना जसवंतीबेन यांनी ईटीव्ही भारताशी बोलताना व्यक्त केली. गेली 60 वर्षे जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या लिज्जत पापडला घराघरात पोहचवून जसवंतीबेन पोपट यांनी श्री. महिला गृहउद्योगाला बळ दिले आहे.
80 रुपायांच्या भाडवलापासून सुरुवात-
मार्च 1959 मध्ये मुंबईत गिरगावातील सात महिलांनी ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ या पापड तयार करण्याच्या संस्थेला सुरुवात केली होती. केवळ महिलाच सहमालक असणारा हा जगातील एकमेव गृहउद्योग आहे. सात गृहिणींनी 80 रुपयाच्या भांडवलासह सुरू केलेला पापड उद्योग आज 1600 कोटींहून अधिक रुपयांच्या घरात पोहोचला आहे. ‘कर्रम् कुर्रम् कुर्रम् कर्रम्’ हा मंत्र जपत लिज्जत पापडने 60 वर्षांचा प्रवास यशस्वीपणे पार केला आहे.
जसवंतीबेन आजही सक्रीय-
मला खूप आनंद होत आहे. लिज्जतला हा मान मिळाला आहे. छगन बाप्पा आणि दत्तानी बाप्पा यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आज एवढी मोठी संस्था उभी केली. आम्ही 7 जणी एकत्र येत ही संस्था सुरू केली. आज ही संस्था घराघरात पोहोचली आहे, असे जसवंतीबेन यांनी सांगितले.
लिज्जत ही संस्था सुरू झाली तेव्हा ज्या महिलेचे यात महत्वाचे योगदान होते अशा जसवंतीबेन पोपट यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याने खूप आनंद होत आहे. लिज्जत पापडसाठी ही सन्मानाची बाब आहे. आज संस्थेच्या 83 शाखा असून त्यात 45 हजार महिला कार्यरत आहेत. 80 रुपयांपासून सुरू केलेल्या या व्यवसायाचे वार्षिक उत्पन्न सोळाशे कोटीवर पोहोचले आहे, असे श्री महिला गृहउद्योग संस्थेच्या अध्यक्षा स्वाती पराडकर यांनी सांगितले.
हेही वाचा -रेल्वे तिकीट काळाबाजार : 71 हजार रुपयांची तिकीटे जप्त, २ जणांना अटक